भविष्यातील पराभवाचे वाटेकरी व्हायचे नाही, असे विधान महिनाभरापूर्वी करणाऱ्या नारायण राणे यांनी आता मात्र ‘काँग्रेस जिंकणार म्हणजेजिंकणारच’, असा निर्धार केला आहे. लोकसभा निवडणुकीत कोणत्या मतदारसंघात पराभव झाला, कोणी दगाफटका केला, षडयंत्रे रचली हे सारे ध्यानात घेऊन विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जा, असा सल्ला काँग्रेसजनांना देत राष्ट्रवादीला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रचार समितीचे अध्यक्ष म्हणून राणे यांनी ‘िजकणारच’ आणि ‘मोदींनी केली जनतेची फसवणूक’ या दोन पुस्तिका प्रकाशित केल्या आहेत. ‘जिंकणारच’ या पुस्तिकेत राणे यांनी पाच पानी लेखात,जिंकायचे, माघार घ्यायची नाही, असा सल्ला काँग्रेसजनांना दिला आहे. लोकसभा निवडणुकीत आपले पुत्र निलेश यांचा पराभव दगाफटक्यामुळे झाल्याचा आरोप राणे यांनी केला होता. निलेश यांनी तर थेट राष्ट्रवादीचे नेते भास्कर जाधव यांना आपल्या पराभवास जबाबदार धरले होते. हाच धागा पकडीत राणे यांनी लोकसभा निवडणुकीत कोणी षडयंत्रे रचली हे सारे लक्षात घेऊन विधानसभा निवडणुकीची पायभरणी करू या, असे आवाहन पक्षाच्या नेत्यांना केले आहे.
लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचा पराभव हा इतिहास समजू या, तर विधानसभेच्या निवडणुकीत भविष्यकाळ उज्ज्वल असेल, असा दिलासा देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. दुसऱ्या महायुद्धात जर्मनी आणि जपान या देशांची राखरांगोळी झाली, ते बेचिराख झाले. आपला देश पुन्हा उभा करण्याचा निर्धार या दोन्ही राष्ट्रांमधील जनतेने केला आणि थोडय़ाच काळांत ही दोन्ही राष्ट्रे प्रगत देश म्हणून पुढे आले. हीच जिद्द काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंगी बाणवायची असून,  काँग्रेसला पुन्हा गतवैभव मिळवून देऊ या, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या १५ वर्षांंत काँग्रेस आघाडी सरकारने राज्याला पुढे नेले. हे जनतेसमोर आणावे, असे आवाहन राणे यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या भाजपचे पाय जमिनीवर राहिलेले नाहीत. १०० दिवसांतच जनतेचा सरकारबद्दल भ्रमनिरास झाला आहे. कोणतीही लाट फार काळ टिकत नाही. भरती कायम ओसरत जाते. ही पाश्र्वभूमी लक्षात घेता विरोधकांचे आव्हान पेलण्यासाठी सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी हातभार लावल्यास यश अवघड नाही याची जाणिव राणे यांनी करून दिली आहे.