महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचे काम नरेंद्र मोदी करीत असून १०५ हुतात्मे देऊन निर्माण झालेला महाराष्ट्र हे कदापीही सहन करणार नाही, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी शनिवारी सांगली येथे केले. सिनेअभिनेत्री नगमा, डॉ. पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत वसंतदादांच्या समाधीस्थळानजीक काँग्रेसचे मदन पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ राणे यांच्या हस्ते आज झाला.
यावेळी बोलताना राणे यांनी सांगितले की, मुंबई येथील बंदरामध्ये होणारी वाहतूक गुजरातमध्ये वळविण्यात आली. रिझव्र्ह बँकेचे तीन विभाग दिल्लीला हलविण्यात आले. यामागे मुंबई तोडण्याचा डाव असून मराठी जनता हा डाव कधीही यशस्वी होऊ देणार नाही. भाजपाचे राष्ट्रीय एकात्मतेसाठी कोणतेही योगदान नाही. सत्तेत आल्यावर महागाई कमी होण्याऐवजी ३० टक्क्यांनी वाढली.
राज्याचे मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपामध्ये अनेक इच्छुक आहेत याबाबत उपहासात्मक बोलताना राणे म्हणाले की, अजून मंडप नाही, नवरी नाही तरी पण १२ जण बािशग बांधून तयार आहेत. शिवसेनेला राज्यात लोकांची साथ मिळणार नाही. काँग्रेसचा प्रमुख विरोधक हा भाजपाच असेल.  
राष्ट्रवादी हा वादावादीचा पक्ष असून या निवडणुकीनंतर त्यांचे संख्याबळ 40 पर्यंत खाली येईल. मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी त्यांनी आघाडी तोडली. सर्व बाजूंनी राष्ट्रवादी बदनाम झाली असून त्याची किंमत त्यांना मोजावी लागेल. निवडणुकीनंतर राष्ट्रवादीशी पुन्हा आघाडी अशक्य असून अशा विश्वासघातकी प्रवृत्तीला सोबत घेण्याची अजिबात इच्छा नाही.
यावेळी बोलताना डॉ. कदम म्हणाले की, राष्ट्रवादीने प्रत्येकवेळी वेगळी भूमिका घेतली होती. त्यामुळे आघाडी तुटल्याचे परिणाम काँग्रेसवर होणार नाहीत. खोडय़ा काढण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रवृत्तीमुळे आघाडीला फटका बसला. आता सामान्य कार्यकर्त्यांच्या इच्छेप्रमाणे झाले असून सांगली जिल्ह्यात काँग्रेसला पाच जागा मिळतील. यावेळी अभिनेत्री नगमा यांनी मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या कारभारामुळे लोकांचा भ्रमनिरास झाला असल्याचे सांगितले. उमेदवार मदन पाटील यांनी आघाडी तुटल्यामुळे खऱ्या अर्थाने कोणाची किती ताकद आहे ते समजणार असल्याचे सांगत सांगलीचा खुंटलेला विकास साध्य करण्यासाठी जनता निश्चितपणे काँग्रेसला साथ देईल असे सांगितले.
जाहीर सभेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी सांगितले की, विकासाच्या मुद्दय़ावर काँग्रेस लोकांसमोर जात असून गेल्या १५ वर्षांतील विकासकामामुळेच जनता आम्हाला पुन्हा संधी देईल. आर. आर. पाटील यांनी पोलीस विभागाची वाट लावली. केवळ प्रसिध्दीसाठी त्यांनी वापर करून घेतला. मोरारजी देसाई यांनी महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा प्रयत्न केला. तोच करंटेपणा मोदी करीत असून  ते मुंबईवर सूड उगवित असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.