कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे तीन जिल्हे मिळून विधानसभेच्या १५ जागा असून, बहुरंगी लढती असल्या तरी रायगड जिल्ह्य़ातील सात जागांपैकी अलिबाग, पेण व उरण या तीन ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष(शेकाप) व काँग्रेस, कर्जत व श्रीवर्धनमध्ये सेना आणि राष्ट्रवादी, तर पनवेलमध्ये भाजप-काँग्रेस आणि महाडमध्ये सेना व काँग्रेस यांच्यात मुख्य लढती आहेत. कोकणातील रायगडमध्ये lok08शेकापचा प्रभाव असून, या वेळी हा पक्ष अस्तित्वासाठी लढत आहे. या निवडणुकीत सुनील तटकरे आणि नारायण राणे यांची कोकणातील दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
शेकापने सातत्याने वर्चस्व राखलेल्या अलिबाग मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजप उमेदवारांकडून विजयाची अपेक्षा नसली तरी त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. शिवसेनेचे किशोर जैन, संजय जांभळे(राष्ट्रवादी) आणि राम घरत (भाजप) हे तीन मातब्बर नेते पेण मतदारसंघात वेगवेगळ्या पक्षांतून या वेळी एकमेकांसमोर उभे ठाकले असल्याने निवडणूक रंगतदार झाली आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा मतदारसंघ अशी श्रीवर्धनची ओळख. विधान परिषदेवर निवडून गेल्याने ते स्वत: ही निवडणूक लढवत नसले तरी त्यांच्यासाठी ती प्रतिष्ठेची आहे. कोकणातील सर्वाधिक विकासनिधी आलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून तटकरे याचे पुतणे अवधूत तटकरे, शिवसेनेकडून उपजिल्हा प्रमुख रवी मुंडे, भाजपकडून शिवसेना बंडखोर कृष्णा कोबनाक, तर काँग्रेसकडून उदय कठे रिंगणात आहेत. अवधूत यांच्या उमेदवारीला तटकरेंच्या दोन्ही मुलांचाच विरोध होता, असे सांगितले जाते. lok09शिवाय राष्ट्रवादीचे अशोक साबळे व राजू साबळे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. प्रमुख पक्षांतील बंडखोरीमुळेही येथील निवडणूक रंगतदार ठरणार आहे.  
शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या महाड मतदारसंघात सेनेच्या भरत गोगावले आणि काँग्रेसच्या माणिक जगताप यांच्यात चुरस असून, भाजप आणि शेकापची सोबत नसल्याने शिवसेनेसमोरील अडचणी वाढल्या आहेत, तर काँग्रेससाठी राष्ट्रवादीचा उमेदवार डोकेदुखी ठरणार आहे.
कर्जत आणि खालापूर तालुका मिळून तयार झालेल्या कर्जत मतदारसंघात या वेळीही राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात लढत अपेक्षित आहे. दोन्ही पक्षांना अंतर्गत बंडखोरीला सामोरे जावे लागले आहे. ती थोपवण्यात हे पक्ष कितपत यशस्वी होतात यावर निकाल अवलंबून असेल.
शेकापचा गड मानल्या जाणाऱ्या पनवेल मतदारसंघातून गेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून प्रशांत ठाकूर यांनी खळबळजनक विजय नोंदवला; पण यंदा ते भाजपकडून रिंगणात आहेत. तरीही जिल्ह्य़ातील राजकीय चित्र पाहता शेकापची ताकद राहील, अशी अपेक्षा आहे.    
रत्नागिरीत सेनेचेच वर्चस्व
यंदाच्या निवडणुकीत जिल्ह्य़ातील पाचही मतदारसंघांमध्ये बहुरंगी लढती असल्या तरी सद्य:स्थिती शिवसेनेचेच वर्चस्व राहील, अशी चिन्हे आहेत. दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर या पाच मतदारसंघांपैकी दापोली, चिपळूण आणि राजापूर या तीन ठिकाणी गेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले. त्यापैकी दापोली मतदारसंघातून गेल्या पाच निवडणुका जिंकलेले शिवसेनेचे आमदार सूर्यकांत दळवी पुन्हा रिंगणात आहेत. या वेळी त्यांच्याविरोधात भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसेचेही उमेदवार असले तरी निकालात फरक पडेल, असे दिसत नाही.
गुहागर मतदारसंघामध्ये भाजपचे माजी आमदार डॉ. विनय नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांच्यात मुख्य लढत असली तरी राणे पिता-पुत्रांनीही जाधवांच्या पराभवाचा विडा उचलला असून, त्यांचे विश्वासू कार्यकर्ते संदीप सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे; पण आज तरी जाधवांचेच पारडे जड आहे.
चिपळूण मतदारसंघातून मागील निवडणुकीत विजयी झालेले शिवसेनेचे सदानंद चव्हाण यंदाही त्याची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने रिंगणात उतरले आहेत; पण त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळे ही लढत रंगतदार झाली आहे.
उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेले माजी मंत्री उदय सामंत यांच्यामुळे रत्नागिरीतील निवडणुकीला कलाटणी मिळाली आहे. येथे त्यांची लढत भाजपचे माजी आमदार बाळ माने यांच्याशी आहे. गेल्या दोन निवडणुकांमध्ये मानेंविरोधात सामंतांनी विजय मिळवला आहे. सेनेच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांना अचानक उमेदवारी दिल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये सुरुवातीला अस्वस्थता होती; पण या पक्षामध्ये सारा कारभार आदेशावर चालत असल्यामुळे आणि गेल्या बुधवारी झालेल्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेमुळे वातावरण बदलले आहे. त्यानुसार कार्यकर्त्यांनी नाराजी बाजूला ठेवून काम केल्यास सामंतांचा विजय सुकर होऊ शकतो. अशा परिस्थितीत येत्या सोमवारी होणाऱ्या पंतप्रधान मोदी यांच्या सभेवर भाजप कार्यकर्त्यांची मोठी भिस्त आहे.
राणेंची अस्तित्वाची लढाई
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे राजकारण नेहमीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्याभोवती फिरत राहिले आहे. लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर ते चिरंजीव नितेश(कणकवली) याच्यासह कुटुंबाच्या राजकीय अस्तित्वासाठी रिंगणात उतरले आहेत. भाजपचे विद्यमान आमदार प्रमोद जठार यांच्याशी नितेश यांची लढत असून, सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी राणेंपुढे कडवे आव्हान उभे केले आहे. युती तुटल्यामुळे राणे काहीसे सुखावले असले तरी सिंधुदुर्गातील जनतेने त्यांना माफ केले आहे का? यावरच या निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. रायगडात शेकाप, रत्नागिरीत सेना, तर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात राणेंमुळे काँग्रेसची पकड आहे. राष्ट्रवादीचा जोर पक्षांतरातुळे कमी झाला आहे. यंदाच्या निवडणुकीनंतरही हेच चित्र कायम राहण्याची चिन्हे आहेत.