पुणे जिल्ह्य़ातील २१ विधानसभा मतदारसंघांत दाखल झालेल्या एकूण उमेदवारी अर्जापैकी ७८ उमेदवारांचे अर्ज सोमवारी छाननीमध्ये बाद झाले असून ४८२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. कसबा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांचा अर्ज बाद झाला, तर कॅन्टोन्मेंट मतदारसंघातील याच पक्षाच्या उमेदवार हीना मोमीन यांचा अर्जही बाद झाला,भोसरीतून शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेल्या सुलभा उबाळे यांच्या अर्जावर मंगळवारी निर्णय होणार आहे. दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जाची सोमवारी उमेदवारांच्या प्रतिनिधीसमोर छाननी झाली. काही उमेदवारांच्या प्रतिनिधींनी विरोधी उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेतल्यानंतर त्याची शहानिशा करण्यात आली. भोसरी मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवार सुलभा उबाळे यांच्या प्रतिज्ञापत्रावर आक्षेप घेण्यात आला आहे. प्रतिज्ञापत्रासंबंधित कागदपत्रांवर म्हणणे सादर करण्यास त्यांना मंगळवापर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यामुळे उबाळेंच्या अर्जावर तेव्हाच निर्णय होणार आहे.