राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्टिमेटमला भीक न घालता काँग्रसने विधानसभेच्या २८८ जागांची चाचपणी करून त्यासंबंधीची विस्तृत यादी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे पाठवली आहे. गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून बसलेले मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे बैठकांमध्ये व्यस्त आहेत. महायुतीमध्ये जागावाटपावरून घमासान सुरू असल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीने ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ अशी भूमिका घेतली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दोनदा काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतरही जागावाटपाचा निर्णय झालेला नाही. सोनिया यांनी प्रतिसाद न दिल्याने आता शरद पवार त्यांची भेट घेणार नसल्याचे राष्ट्रवादीच्या  सूत्रांनी सांगितले. प्रफूल्ल पटेल-अहमद पटेल या नेत्यांच्या स्तरावर आघाडीच्या भवितव्याची चर्चा होणार आहे.
बैठक सुरू होण्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना काँग्रेस सरचिटणीस मधुसूदन मिस्त्री म्हणाले की, आम्हाला आघाडी तोडायची नाही. परंतु आम्ही २८८ मतदारसंघाची चाचपणी करीत आहोत. प्रत्येक मतदारसंघात उमेदवार देता येईल का, यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली. एकीकडे राष्ट्रवादीशी चर्चा सुरू असताना काँग्रेसने स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. त्यामुळे आघाडीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. अर्थात आघाडीच्या भवितव्याविषयी बोलण्याचे मिस्त्री यांनी टाळले.
प्रदेशाध्यक्ष, मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते एकत्र बैठक करून त्यासंबंधी निर्णय घेतील, असे ते म्हणाले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, वेगवेगळ्या स्तरावर राष्ट्रवादीशी चर्चा सुरू आहे. तोपर्यंत आम्ही आमच्या कोटय़ातील जागांसाठी उमेदवार निश्चित करीत आहोत. आतापर्यंत किती उमेदवांची निश्चिती झाली आहे, यावर बोलण्याचे चव्हाण यांनी टाळले.