भाजप आणि शिवसेनेत जागावाटपाचे गणित जुळत नसतानाच काँग्रेस आणि राष्ट्रवादीने परस्परांना डिवचण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने १२४ पेक्षा जास्त जागा देणे शक्य नाही, असे स्पष्ट करताच राष्ट्रवादीने हे सूत्र फेटाळून लावले आणि सोमवार सकाळपर्यंतची काँग्रेसला मुदत दिली. आघाडी कायम ठेवायची आहे, पण जागा वाढवून मिळाल्या पाहिजेत, असे काँग्रेसला बजावत टोकाची भूमिका घेण्याचे राष्ट्रवादीने टाळले. मात्र, १४४ जागांची आमची मागणी काँग्रेसला मान्य नसेल्यास अन्य पर्याय खुले असल्याचा इशारा दिला.
काँग्रेसने १२४ जागा देण्याची तयारी दर्शविली आहे. गत वेळच्या तुलनेत दहा जागा जास्त असल्या तरी २००४ मध्ये एवढय़ाच जागा आमच्या वाटय़ाला आल्या होत्या. यामुळे जास्त जागा कसे म्हणता येईल, असा सवाल प्रफुल पटेल यांनी केला. निम्म्या म्हणजे १४४ जागांची आमची मागणी अद्यापही कायम आहे. पण त्यावर काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांकडून अद्याप प्रतिसाद मिळू शकलेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.  
सोमवारी सकाळी आपण मुख्यमंत्री व राज्याचे प्रभारी यांच्याशी चर्चा करू. पुढील शनिवापर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. महायुतीची चर्चा मार्गी लागण्याची शक्यता दिसते. तेव्हा आघाडीचा निर्णय तात्काळ होणे गरजेचे आहे, असे पटेल यांनी सांगितले.