आघाडीत शरद पवार नाराज होणार नाहीत यावर सोनिया गांधी यांचा आतापर्यंत भर राहिला. पण राहुल गांधी यांच्या निकटवर्तीयांकडे सूत्रे जाताच राष्ट्रवादीला फार काही मुक्तवाव देऊ नये, अशा पद्धतीने पाऊले टाकण्यात आली. त्यातूनच काँग्रेसने आघाडीत जागावाटपावरून ताणून धरले आहे. परिणामी वेगळे लढावे की आघाडी कायम ठेवावी, असा प्रश्न राष्ट्रवादीपुढे निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीने अजून ‘थांबा आणि वाट पाहा’ धोरण स्वीकारल्यामुळे राष्ट्रवादी एकदम टोकाची भूमिका घेणार नाही, हे संकेत मानले जातात.
सोनिया गांधी यांचे राजकीय सचिव अहमद पटेल आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात बैठका झाल्यावर राष्ट्रवादीला अपेक्षित असा तोडगा निघायचा. ही परंपरा अनेक वर्षे कायम राहिली. यंदा दोन पटेलांमध्ये चर्चेच्या फेऱ्या झाल्या तरी राष्ट्रवादीला अनुकूल ठरेल, असा तोडगा निघू शकलेला नाही. शरद पवार आणि राहुल गांधी यांच्यात एकमेकांबद्दल कायम अढी राहिली आहे. प्रत्येक वेळी राष्ट्रवादीच्या कलानेच का घ्यायचे, असा सवाल राहुल यांच्या निकटवर्तीयांनी केला. राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजाविणारे मधूसुदन मिस्त्री या राहुल यांच्या निकटवर्तीयांनी राष्ट्रवादीच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे समजते. राष्ट्रवादीबद्दल साशंकता
काँग्रेसच्या गोटात राष्ट्रवादीबद्दल साशंकता आहे. राष्ट्रवादीची भाजपशी जवळीक वाढल्याचा मुद्दा पुढे रेटण्यात येत आहे. राष्ट्रवादीने सादर केलेल्या अटींवरून पक्ष आघाडीसाठी कितपत गंभीर आहे याबाबत साशंकता येते, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार यांचा आघाडीला ठाम विरोध आहे. अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद ही अट अजितदादांमुळेच पुढे आल्याची शक्यता आहे. प्रफुल्ल पटेल यांनी आघाडीसाठी राष्ट्रवादी अजूनही तयार आहे, पण जागावाटप सन्मानाने झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जागांची मागणी अमान्य?
राष्ट्रवादीने जास्त जागांची मागणी केल्याच्या पाश्र्वभूमीवर काँग्रेसने १५ ते १८ मतदारसंघांची यादी राष्ट्रवादीला सादर केली. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या  बैठकीत काँग्रेसकडून सादर करण्यात आलेल्या यादीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. राष्ट्रवादीने १४४ मतदारसंघांची मागणी केली असली तरी काँग्रेसने सध्या तरी १२४ मतदारसंघ देण्याची तयारी दर्शविली आहे. वाटाघाटींमध्ये काँग्रेसकडून १२८ पर्यंत संख्याबळ वाढवून दिले जाऊ शकते. मात्र, राष्ट्रवादीची सध्या तरी तेवढेही मतदारसंघ स्वीकारण्याची तयारी दिसत
नाही.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागावाटपाची चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी कराडमध्ये स्थानिकांशी संवाद साधला. कराड दक्षिण मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांची उमेदवारी निश्चित आहे.
मुख्यमंत्र्यांविरोधात अतुल भोसले?
काँग्रेस नेते अमल महाडिक आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल भोसले यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला. भोसले यांना मुख्यमंत्र्यांविरोधात  तर महाडिक यांना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याविरोधात कोल्हापूरमधून उमेदवारी दिली जाणार आहे.