सकाळचा नाश्ता उरकला आणि सगळे नानांच्या ओसरीवर गोळा झाले. नानांनी पानाचा डबा आणला. बाबांनी बंडीच्या खिशातून दोन-तीन सुपाऱ्या काढून डब्याच्या एका कप्प्यात ठेवल्या. तात्यांनी पेपरात गुंडाळलेली पानं काढली, आबांनी तंबाखूची पुडी काढली, आणि दादांनी चुना ठेवला.
दादांच्या खिशात नेहमी नुसता चुना का असतो, हे कोडं कधीच बाकीच्यांना उलगडलं नव्हतं.
अशा रीतीने, नानांचा पानाचा डबा परिपूर्ण झाला.
‘आता कसा, डबा अगदी महायुतीसारखा सजला’.. भरलेल्या डब्याकडे कौतुकाने पाहात नाना म्हणाले.
सगळे आपापल्या घरी गेल्यावर उरलेली पानं, सुपाऱ्या, तंबाखू-चुना आपल्याच डब्यात राहणार, हे नानांना माहीत होतं.
नानांनी महायुतीचा उल्लेख केला, तेवढय़ात आत बसलेल्या बंडय़ानं रिमोट कंट्रोलनं टीव्ही चालू केला..
‘महायुती तुटली.. टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज दाखवतायत’.. बंडय़ा जोरात ओरडला आणि सगळे जण आत टीव्हीसमोर उभे राहिले.  
‘दुसरं च्यानेल लावून बघ त्या ठिकाणी’.. चुन्याची पुडी पिळत दादा म्हणाले.  
बंडय़ानं चॅनेल बदललं. ‘महायुतीचा तणाव वाढला’ अशी ब्रेकिंग न्यूज तिथे दिसत होती.
आबा आणि दादांनी एकमेकांकडे बघितलं. दादांच्या हातातील चुन्याच्या पुडीतून बाहेर आलेला चुना आबांनी हलकेच बोटावर घेतला आणि तळव्यावरचा तंबाखू मळून तोंडात टाकला..
‘जागावाटपाचा घोळ अजून सुरूच आहे यांचा’.. बाबांच्या चेहऱ्यावर उगीचच चिंता उमटली होती.
‘असू द्या. त्यांनी वेळ लावला, तर आपलं काय ते ठरवून घेऊ त्या ठिकाणी’.. दादा म्हणाले.
‘आपलं काय ठरवायचंय.. मागंच ठरलंय. तसंच होणार’.. बाबा म्हणाले. त्यांचा आवाज चढला होता.
दादांनी रागानं ‘हं’.. म्हटलं, तेवढय़ात आबांनी खिडकीतून बाहेर पिंक सोडली. उलटं मनगट हनुवटीवरून फिरवलं..
‘काय तोडगा तो निघत न्हाई म्हना की’.. आबा आनंदानं म्हणाले.
दादांचे डोळेही चमकत होते.
‘मी सांगतो.. काही झालं तर तुम्ही विचार करताय तसलं काही होणार नाही.. तो खूप जुना फेविकॉलचा जोड आहे’.. बाबा विश्वासानं म्हणाले.
‘पण काय तरी तोडगा तर सुचला पायजे की न्हाई’.. आतापर्यंत गप्प बसलेले तात्या उगीचच काही तरी बोलायचं म्हणून बोलले.
‘मला म्हाईत हाये तोडगा. पन त्यो भायेर सांगू नका’.. नाना म्हणाले, आणि सगळे गप्प झाले. नाना थेट फारसे बोलत नसले, तरी त्यांच्याकडे नेहमीच काय तरी तोडगा असतो, हे सगळ्यांनाच माहीत होतं.
‘त्यांनी असं करावं’.. नाना म्हणाले, आणि थांबले. त्यांनी सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं. ते पुढे बोलू लागले.
‘सगळ्यांनी एकमेकांना मुख्यमंत्रिपदाची ऑफर द्यावी.. मग जागावाटपाचा प्रश्न आपोआप सुटेल. मग ज्याच्या हाती सत्ता येईल, ते भांडू द्यात नंतर.. आता तरी सगळं ठीक होईल’.. नाना म्हणाले, आणि दादांनी मान फिरवून बाबांकडे बघितलं..
.. बाबा नेहमीप्रमाणे आढय़ाकडे पाहात विचारात मग्न झाले होते..