27 January 2021

News Flash

नव्या राजकारणाची नांदी!

वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदान म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाचे ‘मागचे दार’.. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेतील भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी

| September 26, 2014 04:12 am

वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदान म्हणजे, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाचे ‘मागचे दार’.. लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेतील भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐकण्यासाठी महामुंबईच्या कानाकोपऱ्यातून जमलेल्या गर्दीने शिवसेनेच्या सभांच्या इतिहासातील विक्रमही मोडीत काढले होते. त्यातच, नरेंद्र मोदींनी तर आपल्या भाषणात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेखदेखील केला नव्हता. मोदींची सभा संपली आणि मुंबईत याच मुद्दय़ाची चर्चा सुरू झाली. मुंबईत येऊनही, मित्रपक्षाच्या सर्वोच्च आणि शक्तिमान नेत्याचा साधा उल्लेखदेखील भाजपच्या नेत्याने केला नाही, ही बाब शिवसेनेला बोचली होती. मुंबईवर बाळासाहेबांचीच जादू चालते आणि बाळासाहेबांच्या इशाऱ्यानेच मुंबई थांबते, असा सबळ समज असलेला शिवसैनिक दुखावला, आणि सेना-भाजपच्या मैत्रीत लोकसभा निवडणुकीआधीच मिठाचा खडा पडला.. मात्र, या काळात मोदी या नावाच्या जादूने सारा देश भारावलेला होता. महाराष्ट्रातही त्याचे प्रतिबिंब स्पष्ट उमटले होते. त्यामुळे, फारकत घेण्यात शहाणपणा नाही, हे शिवसेनेच्या नेतृत्वाने ओळखले, आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत, नाखुशीनेच भाजपसोबत युती टिकविण्याचा निर्णय सेना नेत्यांना घ्यावा लागला. या निवडणुकीत अपेक्षेहूनही भरघोस यश महाराष्ट्रातही मिळाले, आणि ४८ पैकी ४२ लोकसभा मतदारसंघांवर महायुतीचा भगवा फडकला.. आता महायुती विसर्जित झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ अटळ आहे. नव्या राजकारणाची नांदी सुरू झाली आहे.
सन १९८९ ते २०१४ या जवळपास २५ वर्षांच्या एकत्र वाटचालीतील हे महाराष्ट्रात शिवसेना आणि भाजपला मिळालेले सर्वात तेजस्वी यश होते. तरीही सेनेत खदखद होती. मोदी यांची हवा महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीच्या काळातही टिकविण्यात भाजपला यश आले, तर गेली २५ वर्षे मोठय़ा भावाची भूमिका बजावत भाजपला वेळोवेळी वाकविण्याची ताकदच खच्ची होईल, याचे संकेत सेनेला अस्वस्थ करीत होते. मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी स्थापन झालेली मराठमोळी संघटना ते केंद्रीय राजकारणात प्रभावशाली असलेला एक प्रभावी राजकीय पक्ष अशा शिवसेनेच्या वाटचालीत भाजपचा मोठा वाटा होता. मुंबई महापालिकेची सत्ता, ठाणे-कोकणात रुजलेली मराठी माणसांची संघटना म्हणूनच महाराष्ट्रात आपली वेगळी अशी राजकीय संस्कृती रुजविण्याच्या प्रयत्नात असलेल्या या संघटनेला सोबत घेतले, तर राजकारणात अनेक बेरजा साधता येतील, याची जाणीव पहिल्यांदा भाजपचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांना झाली. प्रमोद महाजन हे महाराष्ट्रातील नेते असले, तरी भाजपच्या स्थापनेपासून दिल्लीतही ते सक्रीय होते. त्यामुळे, महाराष्ट्रातील या समीकरणाच्या कल्पनेस केंद्रात अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आदी त्या वेळच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सहजपणे हिरवा कंदिल मिळाला आणि मराठी माणसांच्या या संघटनेस हिंदुत्वाच्या विचाराच्या धाग्याने भाजपच्या सोबत बांधण्यात प्रमोद महाजन याना यश आले. युतीच्या राजकारणाची ऐतिहासिक मुहूर्तमेढ रोवली गेली. बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांची नावे सेना-भाजप युतीचे शिल्पकार म्हणून राज्याच्या राजकीय इतिहासात नोंदली गेली.
हे दोन पक्ष राजकारणासाठी एकत्र आले असले, तरी स्वबळ वाढविण्याचे प्रयोग उभय पक्षांकडून सातत्याने सुरू होते. दुसऱ्या पक्षाचा आधार घेत स्वपक्षाचे बळ वाढविण्याच्या प्रयत्नांत अनेकदा कुरघोडीचे राजकारणही करावे लागते. सेना-भाजपच्या एकत्र वाटचालीत त्या राजकारणाचे अनेक रंग महाराष्ट्राने पाहिले. मात्र, अशा प्रत्येक कुरघोडीच्या खेळात लहान भावाची भूमिका भाजपने जाणीवपूर्वक पार पाडली. बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व भाजपने महाराष्ट्रात स्वीकारले आणि मानापमानाच्या अनेक प्रसंगांत नमते घेऊन बाळासाहेबांचा मानही राखला. रुसव्या-फुगव्यांच्या नाटकांचा शेवट गोड व्हावा यासाठी प्रमोद महाजनच नव्हे, तर अडवाणी-वाजपेयींसारख्या नेत्यांनीही मध्यस्थी करून बाळासाहेबांची मनधरणी केली.   विजयी जागांच्या संख्येच्या सूत्रानुसार, ज्याच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री असे ठरले, आणि अधिक जागांवर विजयी झालेल्या शिवसेनेच्या मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. भाजपचे गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. या काळातही युती सरकारमध्येदेखील कुरबुरीचे अनेक प्रसंग आले.
जोशी-मुंडे यांच्यात सुसंवाद नसल्याच्या चर्चा होत होत्या, आणि त्याला पुष्टी देणारे संकेत उभय नेत्यांकडून दिले जात होते. याच काळात केंद्रातही भाजपच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकार सत्तेवर असल्याने, त्याच्या प्रभावामुळे पुढील निवडणुका जिंकण्याचा कयास बांधून सेना-भाजप सरकारने मुदतीआधीच विधानसभा निवडणुकीस सामोरे जाण्याचे ठरविले, पण १९९९ च्या विधानसभा निवडणुकीची गणिते मात्र चुकली. सेना-भाजपाने सत्ता गमावली. तेव्हापासून पुढे राज्यात केवळ विरोधी बाकांवर बसण्यापुरतेच युतीचे अस्तित्व राहिले. या काळात युती म्हणून कोणतेही राजकीय कार्यक्रम एकत्रितपणे राबविले गेले नाहीत. पुढे शिवसेनेतून नारायण राणे, २००६ मध्ये राज ठाकरे बाहेर पडले, उद्धव ठाकरे यांच्याकडे सेनेची सूत्रे आली, बाळासाहेबांचे निधन झाले.
पाच वर्षांपूर्वी, २००९ मध्ये विधानसभेसाठी उभय पक्षांनी एकत्र येऊन तयारी सुरू केली. भाजपने ११९ तर शिवसेनेने १६९ जागा लढविल्या, पण मुंबई-ठाणे कोकण या हक्काच्या भगव्या पट्टय़ात अपेक्षित यश मिळालेच नाही. सेना-भाजप युती सत्तेपासून दूरच राहिली. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोबत घेऊन शिवसेनेला दूर केले, तर महाराष्ट्रात भक्कम उभारणी होऊ शकेल अशी नवी गणिते भाजप नेत्यांना खुणावत होती. भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी तर तसे प्रयत्नही सुरू केले होते. त्यांची ही इच्छाही त्यांनी लपविली नव्हती. शिवसेना आणि मनसेमध्ये असलेल्या कडवटपणात त्यामुळे अधिकच भर पडली आणि भाजपबद्दलचा संशय बळावत चालला.
२०१२ पासून सुरू झालेले भाजप-मनसे जवळीकीचे हे प्रयत्न विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानंतरही छुपेपणाने सुरूच असल्याने सेना-भाजपमधील कडवटपणात भर पडली होती. या पाश्र्वभूमीवर २०१४ च्या लोकसभा निवडणुकांच्या निकालाने भाजपने, इतिहासातील धाकटय़ा बावाची भूमिका साफ नाकारली आणि प्रथमच सेनेसमोर नमते न घेण्याचा पवित्रा घेतला. आता पुढची लढाई दोन्ही पक्षांना स्वबळावरच लढायची असल्याने, महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळणार आहे.
घटनाक्रम
महायुती
*घटकपक्षांच्या नेत्यांची उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना नेत्यांशी आणि सूफीटेल हॉटेलमध्ये भाजप नेत्यांशी रात्री उशिरापर्यंत बैठक
*उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्रीपर्यंत शिवसेना नेत्यांशी चर्चा.  शिवसेनेकडून सकाळपासून समझोत्याचे प्रयत्न व नवीन सूत्रे
*भाजप नेत्यांच्याही प्रभारी ओम माथूर यांच्या निवासस्थानी सकाळपासून बैठकांचे सत्र
*उद्धव ठाकरे यांचे दुपारी तुळजाभवानीचे दर्शन. विधानसभेवर भगवा फडकावणार, महायुतीची चर्चा सुरुच-ठाकरे यांचे तुळजापुरात प्रतिपादन
*मुंबईत परतल्यावर ठाकरे यांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा
*भाजप प्रदेश कार्यालयात दिवसभर बैठका व उमेदवार निश्चिती, प्रभारी राजीव प्रताप रुडी यांच्या प्रदेश नेत्यांशी चर्चा
*सुकाणू समितीची बैठक संपल्यावर सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास प्रदेश कार्यालयात भाजप
नेत्यांची पत्रकार परिषद
*अखेर शिवसेनेशी काडीमोड. भाजपकडून शिवसेनेच्या जागांवर उमेदवार निश्चितीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरु, घटकपक्षांशीही जागावाटपाच्या चर्चा
आघाडी
*मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे दुपारी कराडहून आगमन. आघाडीचा वाद मिटविण्यासाठी बैठकीची शक्यता. भाजप-शिवसेनेतील घडामोडींवर आघाडीच्या नेत्यांचे बारकाईने लक्ष
*देवेंद्र फडणवीस आणि दिवाकर रावते यांनी परस्परांना दोष दिल्यावर आघाडीच्या कळपात हालचाली सुरु
*राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली सायंकाळी पाच वाजता पत्रपरिषद भाजपचा निर्णय लांबल्याने राष्ट्रवादीचे नेते खासगी दूरचित्रवाणीवाहिन्यांपुढे बसून
*भाजपने घोषणा करताच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंगल्यावरुन राष्ट्रवादी भवनात दाखल
*आघाडी तुटल्याची घोषणा आणि सरकारचा पाठिंबाही काढला
*राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी रात्री उशिरा राजभवनवर जाऊन राज्यपालांना पाठिंबा काढल्याचे पत्र दिले .
भाजपच्या बळात वाढ..
गेल्या काही निवडणुकांत भाजपची ताकद वाढत असून आता  तर केंद्रातील सत्तेमुळे राज्यात एकहाती सत्ता मिळण्याची आशा भाजपला आहे. राज्यातील ही वाढती ताकद लक्षात घेऊनच भाजपने शिवसेनेसोबतची युती संपुष्टात आणल्याचे सांगितले जाते.
१९८९ मध्ये देशभरात ज्वलंत झालेला अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न तसेच हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेनेच्या रमेश प्रभू यांनी विलेपाल्र्यातून जिंकलेली विधानसभा जागेची पोटनिवडणूक या पाश्र्वभूमीवर त्यावेळी हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर शिवसेना आणि भाजप हे दोन पक्ष सर्वप्रथम एकत्र आले. भाजपचे प्रमोद महाजन आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यातील स्नेह या युतीसाठी आधार ठरला होता. भाजप नेते प्रमोद महाजन यांनी ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी राजकीय खेळी केली. शिवसेना-भारतीय जनता पक्षाच्या युतीने राज्यात कॉंग्रेसच्या वर्चस्वाला आव्हान दिले. एकीकडे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची मर्जी सांभाळत आणि दुसरीकडे अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी या ज्येष्ठ नेत्यांचा विश्वास कायम राखत त्यांनी युतीचा किल्ला शाबूत ठेवला. युतीने पंचविशीत पदार्पण केल्यानंतर तिचा मधुचंद्र संपुष्टात आला.
फोटो गॅलरी : शिवसेना, भाजपचा पंचविशीत संपलेला मधुचंद्र
*प्रत्यक्ष युती झाल्यावरही अनेकदा मतभेदाचे मुद्दे उपस्थित झाले, मात्र महाजन आणि बाळासाहेब यांच्यातील स्नेह आणि नात्यामुळे युती अभंगच राहिली.
*१९९५ – महाराष्ट्र राज्यात प्रथमच सत्तांतर घडवून आणण्यात यशस्वी, शिवसेनेला ७३, तर भाजपला राज्यात ६५ जागा. त्याचवेळी केंद्रातही सत्तांतर घडले. सुरुवातीला अवघ्या १३ दिवसांसाठी, नंतर १३ महिन्यांसाठी आणि शेवटी साडेचार वर्षांसाठी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली युतीसह राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार केंद्रात सत्तेवर आले होते.
*१९९८ मध्ये उजेडात आलेल्या ‘यूटीआय’ घोटाळ्यात भाजपच्या ३५०० कोटी रुपयांच्या ‘बेल आऊट’ पॅकेजला शिवसेनेचा विरोध आणि मतभेदाचे मुद्दे पुन्हा ऐरणीवर.
*युतीमधील कुरबुरींना सुरुवात. मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्याकडून भाजपप्रणीत योजनांसाठी अपुरा निधी पुरवठा केला जात असल्याचा भाजपचा आक्षेप. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘मोफत वीज’ देण्याच्या निर्णयास तत्कालीन ऊर्जामंत्री गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन यांचा विरोध.
*बाळासाहेबांची महाजन यांच्यावर खासगी हवाईसेवेच्या मुद्दय़ावरून टीका, तर भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्याकडून ‘झोपडपट्टी पुनर्वसन योजने’च्या अंमलबजावणीबाबत शंका उपस्थित. मात्र वेळोवेळी, महाजन-बाळासाहेब संबंधांमुळे युती अभेद्य.
*१९९९ मध्ये राज्यात कॉंग्रेस आघाडी सत्तेवर. युती विरोधी बाकांवर.
*२००५ मध्ये शिवसेनेतून सुरुवातीस नारायण राणे व नंतर डिसेंबर महिन्यात राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर सेनेची ताकद कमी झाल्याचा भाजपचा आरोप.
*२००९च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्य विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद भाजपच्या एकनाथ खडसे यांच्याकडे.  
*सन २०१२ मध्ये झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीदरम्यान, रामदास आठवलेप्रणीत रिपब्लिकन पक्षाने युतीमध्ये येण्याचा निर्णय घेतला. युतीचे महायुतीत रूपांतर.
*२०१३ मध्ये देशभरात काँग्रेसविरोधी वारे वाहू लागले असतानाच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात यावे, अशी मागणी भाजपमध्ये जोर धरू लागली. यावेळी ‘सामना’ या मुखपत्रातून भाजपवर टीकाही केली .मात्र, अखेर २०१४ ची लोकसभा निवडणूक एकत्र लढायची यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
*याचवेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचा महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय.
*केंद्रात सत्तांतर, मात्र महत्त्वाच्या खात्याचे मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिवसेनेची नाराजी, अनंत गीते यांच्याकडून पदभार स्वीकारण्यात दिरंगाई.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2014 4:12 am

Web Title: new political era begins in maharashtra with maha break up in shiv sena bjp
Next Stories
1 महाराष्ट्राला स्वायत्तता हवी!
2 मनसेच्या यादीत सात आमदार
3 अमित शहांची अलिप्त भूमिका
Just Now!
X