नियम बनविणाऱ्याने त्या नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. मात्र नियम बनविणाऱ्या खात्याची सूत्रे ज्याच्या हातात आहे, त्यानेच नियम मोडला तर? बरे, नियम मोडणारा हा माणूस शारीरिकदृष्टय़ाच नव्हे तर राजकीयदृष्टय़ाही वजनदार. मग त्यांचे करायचे काय, हा प्रश्न नागपूरच्या पोलीस आयुक्तांना शनिवारी पडला. निमित्त घडले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हेल्मेट न वापरता स्कूटर चालवत महाल भागातील रेशीमबाग या संघ मुख्यालयात गेले त्याचे.
गडकरी यांची विनाहेल्मेट स्कूटरस्वारी चित्रवाहिन्यांनी प्रक्षेपित केल्यामुळे क्षणार्धात देशभर त्याचे प्रसारण झाले आणि स्वाभाविकच वादाच्या भोवऱ्यात सापडली. कायद्याचे पालन करा, असे जनतेला सांगणाऱ्या गडकरींनी स्वत:च कायदेभंग केल्याने पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करीत काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग यांनी शरसंधानाची संधी लागलीच साधली. गडकरी यांना शनिवारी सकाळी सरसंघचालक मोहन भागवतांना भेटायला जायचे होते. महाल भागातील त्यांच्या वाडय़ापासून संघ मुख्यालय तसे जवळच आहे. त्यामुळे गडकरींनी मोटारींचा ताफा न वापरता दुचाकी चालवत जाण्याचा निर्णय घेतला. एका साहाय्यकाला मागे बसवून गडकरी रेशीमबागेतल्या संघ मुख्यालयात गेले आणि दोन तासांच्या भेटीनंतर परतले. दुचाकी चालवताना हेल्मेट घातलेच पाहिजे, असे मोटार वाहन कायद्यात नमूद आहे. हा कायदासुद्धा गडकरींकडे प्रभार असलेल्या खात्याचाच आहे. त्यामुळे गडकरींचे दुचाकी चालवणे वाहिन्यांवरून प्रक्षेपित होताच केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री स्वत:च कायद्याचा भंग करून जनतेला नेमका कोणता संदेश देत आहेत, असा सवाल सिंग यांनी केला.