पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निमंत्रणावर विश्वास ठेवून शिवसेनेने मंत्रिमंडळ विस्तारात सहभागी व्हायला हवे होते. मात्र ते सहभागी झाले नाहीत हे आमच्यासाठी दु:खद आणि दुर्देवी असून यापुढे केवळ तत्त्वावर चर्चा व्हावी, मंत्रिपदांची संख्या आणि खाती यावर चर्चा होणार नाही अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यात राष्ट्रवादीचा पाठिंबा घेणार आहे की नाही ते आधी स्पष्ट करा, त्यानंतरच सत्तेत सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय घेऊ, या शिवसेनेच्या भूमिकेवर बोलताना फडणवीस यांनी सेनेला सत्तापदांच्या मागण्यांवरून टोला लगावला. ‘मुळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या निमंत्रणावर विश्वास ठेवून शिवसेनेने केंद्र सरकारमध्ये सहभागी व्हायला हवे होते. मोदींचे निमंत्रण आले म्हणजे पुढचे सर्व प्रश्न तसेच सुटतील यावर विश्वास ठेवला पाहिजे होता. मात्र, मंत्रिपदाची शपथ न घेताच अनिल देसाई यांना माघारी बोलावण्यात आले. पंतप्रधानांचे निमंत्रण नाकारणे हे दुर्दैवी आहे,’ असे फडणवीस म्हणाले. शिवसेना जरी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत असली तरी त्यांचा डोळा विशिष्ट खात्यांवर असल्याचे अप्रत्यक्षरित्या फडणवीस यांनी सुचवले.