दिल्लीत नव्याने सत्तास्थापनेसाठी भाजपला पाचारण करण्यात येण्याची तीव्र शक्यता आह़े  परंतु, नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याकडून यासंदर्भातील अधिकृत प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत ही शक्यता ग्राहय़ धरणार नसल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केल़े  त्याच वेळी सत्तास्थापनेसाठी अन्य पक्षीय आमदारांशी सौदेबाजी किंवा घोडेबाजार करणार नसल्याचेही त्यांनी नमूद केल़े
पूर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री सध्या जम्मू- काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत़  या वेळी त्यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादात दिल्लीतील राजकीय परिस्थितीवरही भाष्य केल़े  नायब राज्यपाल दिल्लीत सत्तास्थापनेसाठी कुणालाही बोलावू शकतात़  मात्र भाजप हा तेथील सर्वात मोठा पक्ष आह़े
दिल्ली विधानसभेत कोणत्याही पक्षाला बहुमत नसल़े  तरीही सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या पक्षाला सत्तास्थापनेची संधी द्यावी, अशी परवानगी मागणारे पत्र नजीब जंग यांनी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्याकडे पाठविले आह़े  त्यामुळे भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावण्यात येण्याची शक्यता आह़े  १७ फेब्रुवारी २०१४ रोजी काँग्रेसच्या पाठबळावर उभ्या राहिलेल्या आप शासनाने राजीनामा दिल्यापासून दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू आह़े