शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आपल्या प्रत्येक सभेत युती तुटण्याचे खापर भाजपवर फोडत असताना महाराष्ट्रातील आपल्या झंझावाती प्रचाराला शनिवारपासून सुरुवात करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेला अनुल्लेखाने मारले. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या बीडमधून प्रचारमोहिमेला सुरुवात केल्यानंतर शनिवारी दिवसभरात मोदींनी औरंगाबाद आणि मुंबई येथे जाहीर सभा घेतल्या. मात्र, एकाही सभेत त्यांनी युती तुटल्याबद्दल खेद व्यक्त केला नाही, की शिवसेनेवर टीकाही केली नाही. त्याचवेळी ‘ज्यांची माझ्याबरोबर व्यासपीठावर बसण्याची िहमत नाही आणि केंद्र सरकार मदतीसाठी पुढे आल्यास दरवाजे बंद करून घेतील, असे राज्य सरकार काय कामाचे,’, ‘अर्धवट जनाधार दिला की, युतीमधील मित्र चांगला नव्हता, असे म्हणण्यास वाव राहतो. त्यामुळे भाजपला पूर्ण बहुमत द्या’, ‘ दिल्लीश्वर ज्यांचे ऐकतील आणि जे दिल्लीचे ऐकतील, असे भाजपचे बहुमताचे सरकार निवडून आणा’ अशी विधाने करत शिवसेनेला अप्रत्यक्षपणे टोलेही मोदी यांनी लगावले.
छत्रपतींच्या नावाने ‘हप्तेवसुली’ – फडणवीस
केवळ शिवजयंती साजरी करून छत्रपती शिवरायांचे वारसदार होता येत नाही. त्यांचे नाव घेऊन हप्तेवसुलीचे काम सुरू आहे. त्याऐवजी छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार कसा होता हे पाहून राज्याचे प्रशासन चालविणारे सरकार हवे, असा टोला प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेत लगावला. छत्रपती शिवराय यांच्यावर कोणाचाही हक्क नाही किंवा तो कोणाचा कॉपीराईट नाही, असेही त्यांनी सांगितले. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याची कोणाचीही हिंमत नाही आणि त्याबाबत केवळ अपप्रचार केला जात आहे, असेही ते म्हणाले. – सविस्तर बातम्या/ सत्ताबाजार
मोदींचे मुद्दे आणि गुद्दे
*शरद पवार यांच्यासारखा राज्यातील मातब्बर नेता केंद्रात कृषीमंत्री असतानाही दरवर्षी महाराष्ट्रात  शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्यांना मात्र याचे सोयरसुतक नाही.
*काँग्रेसने गेल्या ६० वर्षांमध्ये ग्रामपंचायतींपासून केंद्र सरकापर्यंत एकछत्री अंमल गाजविला. तरीही ते सर्वसामांन्यांचे प्रश्न सोडवू शकले नाहीत. हे काँग्रेसचे नेते आज मला ६० दिवसांतच तुम्ही काय केले, असा हिशेब विचारत आहेत,
*मी सर्वसामान्य कुटुंबात जन्माला येऊन कष्ट करुन या पदापर्यंत पोहोचलो आहे. मी सर्वसामान्यांसाठीच काम करीत राहीन.
*मुंडे असते तर मला महाराष्ट्रात येण्याची गरज पडली नसती. पण आजही राज्यातील प्रत्येक तरुण मुंडे आहे. त्यांच्याच तपश्चय्रेचे फळ म्हणून लाखोंचा जनसमुदाय आला आहे.
*नरेंद्र मोदी यांच्या मुंबईतील महालक्ष्मी येथील रात्रीच्या सभेस मोठी गर्दी होतीच; पण बीडमध्ये टळटळीत उन्हात झालेल्या सभेतही हजारोंनी हजेरी लावत मोदींच्या लोकप्रियतेचा प्रत्यय दिला.
*मुंबई आणि महाराष्ट्राचे नुकसान, हे देशाचे नुकसान आहे. त्यामुळे अर्थव्यवस्थेला गती द्यायची असेल, तर येथे विकास साधायलाच हवा, त्यासाठी भाजपला सत्ता दिली पाहिजे.