राज्यातील आघाडी सरकारच्या धोरण लकव्यांमुळेच हापूस आंब्याची जागतिक बाजारपेठेतील विश्वासार्हता कमी झाल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी सोमवारी रत्नागिरीतील सभेत केला.
हापूस आंब्याची जगभरात ओळख निर्माण करून देण्यात येथील शेतकऱयाचे मोठे योगदान आहे. शेतक-यांनी त्यांचे काम अत्यंत चोखपणे बजावले पण, सरकारलाच विश्वासार्हता टिकवता आली नसल्याने जागतिक बाजारपेठेतून आंबा परत आल्याचे मोदी म्हणाले.
शिवरायांनी समुद्राची ताकद ओळखून एक नवी सुरूवात केली होती. नौदलाची पायाभरणी करण्याचे काम छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वत:चे आरमार उभारून केली होती. कोकण किनारपट्टी केवळ मच्छिमारांसाठी उपयुक्त नसून संपूर्ण देशाच्या विकासाचे दार येथून उघडता येऊ शकते, असेही मोदी यावेळी म्हणाले. विकासाच्या दूरदृष्टीचा अभाव असल्यामुळे येथील सरकारला कोकण किनारपट्टीचा योग्यरित्या वापर आणि विकास करता आला नसल्याचे मोदी म्हणाले.
पर्यटन हा सर्वात जास्त रोजगार देणारा व्यवसाय असून देशात सर्वात जास्त पर्यटनातून रोजगार निर्माण करण्यास कोकण किनारपट्टी समृद्ध असल्याचे मोदी म्हणाले. येथे शिवाजी महाराजांनी उभारलेले आणि रक्षण केलेल्या किल्ल्यांचे संवर्धन केले तर, पर्यटकांच्या आकर्षणाचे स्थळ बनू शकतात आणि त्यातून येथील जनतेला मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असेही मोदी पुढे म्हणाले. किनारपट्टीवरील लोकांना केवळ मच्छिमारी व्यवसायावर अवलंबून न राहता येथील मच्छिमारांच्या मुलांना नौदलाचे प्रशिक्षण मिळावे यासाठी प्रशिक्षण केंद्रे उभारता येऊ शकतात, असे मोदी म्हणाले.