पाकिस्तानच्या मुद्दय़ाचे राजकारण करू नका, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी घाटकोपर येथील सोमय्या मैदानावरील जाहीर सभेत विरोधकांना दिला. तुम्ही केंद्रात पूर्ण बहुमत दिल्याने माझे कान पकडण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात पूर्ण बहुमताचे सरकार द्या. त्यांचे चुकले तर प्रदेश भाजप नेत्यांकडे तुम्हाला जाब मागता येईल, असेही मोदी यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या भल्यासाठी कृपया लुळेपांगळे सरकार देऊ नका. बहुमत दिलेत तर  प्रदेश भाजप नेत्यांना तुम्हाला जाब मागता येईल. मात्र लुळेपांगळे सरकार दिलेत आणि कामे झाली नाहीत तर ते एकमेकांनाच दूषणे देत राहतील, असेही मोदी म्हणाले.
पाकिस्तानच्या हल्ल्यांवरून शिवसेनेसकट सर्वच विरोधी पक्ष मोदी प्रचारात गुंतल्याबद्दल टीका करीत आहेत. त्यावरून मोदी म्हणाले की, मी पंतप्रधान असल्याने केवळ वक्तव्य करत नाही तर सीमेवरील जवान आपल्या बंदुकीतून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देत आहेत. ज्यावेळी मुंबईवर अतिरेकी हल्ला झाला त्यावेळी सुद्धा निवडणुकीचा प्रचार सुरू होता. पण आम्ही त्याचे राजकारण केले नाही.
मोदी यांची बारामतीत पवारांवर टीका
बारामतीच्या काका-पुतण्यांनी शेतकऱ्यांना पारतंत्र्यात अडकून ठेवले आहे. त्यांना या गुलामगिरीतून बाहेर काढायचे असेल तर राज्यातही सत्तापरिवर्तन घडविले पाहिजे, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी बारामती येथील सभेत पवार कुटुंबीयांवर त्यांच्याच बालेकिल्ल्यात हल्ला चढवला.