विधानसभा निवडणुकीच्या काळात लागू करण्यात आलेली ३२ दिवसांची राष्ट्रपती राजवट संपुष्टात येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात विधिवत लोकनियुक्त सरकार प्रस्थापित झाले. सत्ता वरिवर्तनाबरोर सारे राजकीय वातावरणही बदलून गेले. नेहमीचे चेहेरे, झेंडे अदृश्य झाले होते. १५ वर्षे विरोधी पक्षाची धुरा संभाळणाऱ्यांना आता सत्तेची गार सावली मिळाली. २० वर्षांनंतर प्रथमच उपमुख्यमंत्रीपदाशिवाय फक्त मुख्यमंत्री व मंत्र्यांचा शपथविधी पार पडला.
१९९९ पासून तीन निवडणुका जिंकून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यात सलग पंधरा वर्षे सत्ता उपभोगली. या पूर्वीचे काँग्रेस आघाडी मंत्रिमंडळाचे शपथविधी सोहळे राजभवनावर पार पडले. त्यावेळी सारे वातावरण काँग्रेस व राष्ट्रवादीमय झालेलेले असायचे. झेंडे, फलक, बॅनर, सबकुच्छ काँग्रेस-राष्ट्रवादी. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, शरद पवार या नेत्यांची मोठमोठी कटआऊट्स लागलेली असायची. गर्दी खच्चून असायची परंतु चेहरे ओळखीचे झालेले. विधानसभा निवडणुकीनंतर सारे वातावरण बदलले.
नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी राजभवनाऐवजी वानखेडे स्टेडियमवर ठेवण्यात आला. सकाळपासूनच वानखेडे मैदानाच्या दिशेने गर्दी सरकत होती. मात्र ते चेहरे वेगळे होते. झेंडे निराळे होते. फलक, बॅनर व त्यावरील नेत्यांची छायाचित्रे वेगळी होती. सत्तापरिवर्तनाबरोबरच शपथविधी सोहळ्याच्या वेळचे वातावरणही आरपार बदलून गेले होते. महाराष्ट्रात आघाडी सरकारचे पर्व १९९५ पासून सुरू झाले. त्यावेळी राजकीय सोय म्हणून एका पक्षाकडे उपमुख्यमंत्रीपद असायचे. मुख्यमंत्र्यांपाठोपाठ दुसरी शपथ उपमुख्यमंत्र्याची व्हायची. यावेळी मुख्यमंत्र्यांनंतर मंत्र्यांचा शपथविधी झाला, २० वर्षांनंतर पहिल्यांदाच उपमुख्यंत्रीपद कुणाला दिले गेले नाही.