विधानसभेचे सदस्य प्रशांत ठाकूर यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा कॉंग्रेस पक्षाच्या वरिष्ठांकडे सुपुर्द केल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीच्या दिशेने वाटचाल करत असल्याची चर्चा पनवेलमध्ये सर्वत्र आहे. उद्या पनवेल शहर व तालुका कॉंग्रेस समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक पनवेलच्या मार्केटयार्ड येथील सभागृहात बोलावली आहे. या बैठकीत प्रशांत ठाकूर हे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसमोर आपली भूमिका मांडणार आहेत. मात्र ठाकूर यांनी भाजपा वाटचालीचा इन्कार केला असून आपण कॉंग्रेसमध्येच असल्याचे स्पष्ट केले आहे. ठाकूर यांच्या राजकीय वाटचालीचे भवितव्य कार्यकर्त्यांसोबतच्या उद्या होणाऱ्या बैठकीमध्ये ठरणार आहे. शीव पनवेल मार्गावरील खारघर येथे सुरु होणारा टोलनाका हा स्थानिक वाहनचालकांसाठी अन्यायकारक असल्याची भूमिका यांनी मांडून सरकारच्या कारभाराला घरचा आहेर दिला.