आधी केंद्रीय मंत्री आणि मग राज्याचे मुख्यमंत्री अशा महत्त्वाच्या पदाची समर्थपणे जबाबदारी सांभाळणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सध्या केवळ ३२ हजार रुपयांची मारूती एस्टीम गाडी वापरत आहेत. मात्र गेल्या तीन वर्षांत पृथ्वीराज चव्हाण यांच्या श्रीमंतीमध्ये दुपटीने म्हणजेच ६ वरून १३ कोटी रुपये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
एप्रिल २०११ मध्ये चव्हाण यांनी विधान परिषदेची निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांची जंगम ४ कोटी, तर स्थावर २ कोटी अशी एकूण ६.७८ कोटी रुपयांची संपत्ती होती. मात्र गेल्या तीन वर्षांत त्यांच्या संपत्तीमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते आहे.
निवडणूक अर्जासोबत चव्हाण यांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नसून कर्जही नाही. मात्र विविध बँकामधील ठेवी, बचतपत्र, एक हजार ५० ग्रॅम सोन्याचे, तर ११.५० किलोग्रॅम चांदी अशी ६ कोटींची जंगम मालमत्ता चव्हाणांची आहे. महत्त्वाचे म्हणजे मारूती एस्टीम ही एकच गाडी त्यांच्याककडे असून त्याची आजच्या बाजारभावाप्रमाणे किंमत ३२ हजार आहे. चव्हाणांकडे दिल्लीत १३०० चौरस फुटाचा प्लॅट, मुंबईत भक्ती पार्क येथे १०३२ चौरस फुटाचा प्लॅट तर करडामध्ये ६ हजार चौरस फुटाचे राहते घर अशी  ७ कोटींची स्थावर मालमत्ताही आहे. कराडमध्येच ९ एकर शेतजमीनही आहे.