लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान घेऊन उमेदवार निवडीचा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा प्रयोग पूर्णपणे फसला होता. तरीही संघटनात्मक निवडणुका सहमतीने करण्याऐवजी पारदर्शकपणे करण्यावर राहुल यांनी भर दिल्याने आधीच मनोबल खचलेल्या काँग्रेसमध्ये गटबाजी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

युवक काँग्रेस आणि एन.एस.यू.आय. या दोन संघटनांच्या धर्तीवर पक्षाच्या मुख्य संघटनेतही निवडणुकीच्या माध्यमातून निवड केली जावी, अशी राहुल गांधी यांची योजना आहे. पक्षाचे पदाधिकारी आणि प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत त्यांनी पुढील वर्षांच्या सुरुवातीला होणाऱ्या संघटनात्मक निवडणुका पारदर्शकपणे आणि निष्पक्षपणे व्हाव्यात, असा आदेश दिला आहे. काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्या कलाने सारा कारभार सुरू झाल्याने पक्षाच्या जुन्याजाणत्या नेत्यांची कुचंबणा झाली आहे.

लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी प्रायोगिक तत्त्वावर देशातील १५ मतदारसंघांमध्ये मतदानाने पक्षाचे उमेदवार ठरविण्यात आले. विशेष म्हणजे या सर्व १५ मतदारसंघांतील उमेदवारांचा पराभव झाला. राज्यात लातूर आणि वर्धा या दोन मतदारसंघांमध्ये मतदानाने उमेदवार ठरविण्यात आले. पण दोन्ही मतदारसंघांमध्ये गटबाजी वाढली. वध्र्यात तर दत्ता मेघे आणि रणजित कांबळे या दोन नेत्यांमध्ये कमालीचा संघर्ष झाला. मतांच्या बेगमीकरिता पैशांचे वाटप झाले होते. मध्य प्रदेशमध्ये तर उमेदवार निवडीच्या प्रक्रियेच्या वेळी मारामारी झाली होती. माजी खासदाराला विरोधी गटाच्या कार्यकर्त्यांनी कोंडून ठेवले होते. हा अनुभव ताजा असताना केवळ कार्यकर्त्यांचे मनोबल उंचाविण्याकरिता राहुल गांधी यांनी निवडणुकीचा मार्ग पत्करला आहे.

पक्षामध्ये एरवी संघटनात्मक निवडणुका या सहमतीने केल्या जातात. गटबाजी ही काँग्रेस कार्यकर्त्यांच्या नसानसात भिनलेली असते. सहमतीने निवडणुका झाल्या तरी वाद कायम राहतात. आता तर निवडणुकीच्या माध्यमातून पदाधिकारी निवडले जाणार असल्याने पक्षांतर्गत दुरावा आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांची प्रत्यक्ष मतदानाने निवड करण्यात आली. निवडणुकीसाठी मतदारांना खुश करण्याकरिता राज्यात मोठय़ा प्रमाणावर ‘लक्ष्मीदर्शन’ झाल्याची चर्चा आहे. प्रदेश काँग्रेसमध्ये हाच प्रकार पुन्हा होण्याची चिन्हे आहेत.