गणपती संपले आणि नवरात्र सुरू झाली आहे. लवकरच दिवाळी येईल. असे सणावारांचे दिवस असताना निवडणुका घेण्याची काही गरज होती का? असा सवाल उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे(मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी निवडणूक आयोगाला निशाण्यावर धरले. 
पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीच्या दिवसांत निवडणुका असत्या तर, तेथील सर्व पक्ष एकत्र आले असते आणि त्यांनी त्या पुढे ढकलल्या असत्या. निवडणूक आयोगाला दिवाळीनंतरही निवडणुका घेता आल्या असत्या पण तशी मागणीच कोणत्या पक्षाने केली नसल्याचे म्हणत यांनी चौफेर टीका केली. ते वणी येथील जाहीर सभेत बोलत होते.
राज यांच्या सभांना ऑक्टोबर ‘हीट’चा फटका बसताना दिसतो आहे. रखरखत्या उन्हामुळे राज यांच्या सभांना तुरळक गर्दी पहायला मिळत आहे. याचे खापर देखील राज यांनी निवडणूक आयोगवर फोडले. ऑक्टोबर ‘हीट’ आणि  त्यात सणासुदीचे दिवस यापार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाला ऑक्टोबरचमध्येच निवडणूक घोषित करण्याची गरज होती का? असा सवाल राज यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राच्या संस्कृतीची जाण कोणत्याही राजकीय पक्षाला राहीलेली नाही. आमच्या पक्षांना सत्वच राहिलेले नाही. महाराष्ट्राचा अभिमान राहिला नाही. असे म्हणत राज ठाकरे राज्यातील सर्वच पक्षांवर बरसले.