जवळजवळ भाजपचे सर्वच उमेदवार आयात केलेले असून, बाळासाहेबांमुळे भाजपला राज्यामध्ये बळ मिळाले आणि आता तेच दंडातल्या बेटकुळ्या दाखवू लागले आहेत अशी टीका करत मनसे अध्यक्ष  राज ठाकरे यांनी रविवारी भांडुप येथे पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार सभेमध्ये भाजपचा समाचार घेतला. राज्यात भाजपच्या एकाही नेत्यांचा जाहीरात फलकावर फोटो नाही. यांना नरेंद्र मोदी यांच्या नावाने मते मागायला लागत असल्याचे सांगात भाजप राज्यात  नेतृत्वहीन असल्याची टीका राज यांनी केली. नरेंद्र मोदी यांच्या अमेरिकी दौऱ्यामध्ये जाणिवपूर्वक गुजराती अस्मिता जपण्याचा प्रयत्न केला गेला असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी या सभेमध्ये  केला. राज्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांमध्ये घराणेशाही बोकाळली असून, सत्तेचे मोठ्याप्रमाण केंद्रीकरण झाले असल्याचा टोला मनसे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी लावला. राज्यातील जनता या चारही पक्षांना लाथाडेल असा विश्वास राज यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपमध्ये आयत केलेल्या राज्यभरातील सर्वच उमेदवारींची यादी राज यांनी उपस्थितांना वाचून दाखवली.
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान की गुजरात चे पंतप्रधान? असा भ्रम तयार झाला आहे, असे म्हणत राज यांनी पंतप्रधान मोदी  यांच्यावर टीका केली. मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन घोषणेचादेखील समाचार राज यांनी घेतला. अहमदाबादच का? इतर शहरे का नाही? असा सवाल राज यांनी या वेळी उपस्थित केला. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन मुंबईमद्ये येऊन येथील उद्योगपतींना महाराष्ट्रात गुंतवणूक का करता? गुजरातमध्ये या तुम्हाला सर्व सुवीधा पुरवू असे आवाहन करतात. यांना राज्याचा गुजरात करायचा असल्याचा खोचक टोला लावत राज यांनी त्यांच्या मोदी यांच्याबद्दलच्या आधीच्या भूमिकेशी फारकत घेतली. राज्याच्या विकासासाठी मनसे कटीबद्द असल्याचे ठाकरे यावेळी म्हणाले.