मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नावाने बनावट फेसबुक आणि ट्विटर अकाऊंट सुरू असल्याचे निष्पन्न झाले असून त्याबाबत शिवाजी पार्क पोलिसांनी गुरूवारी गुन्हा दाखल केला आहे. मनसेतर्फे याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती.
 राज ठाकरे हे फेसबुक तसेच ट्विटरचा वापर करत नाहीत. परंतु फेसबुकवर त्यांच्या नावाने अनेक अकाऊंट उघडण्यात आलेली आहेत. तसेच ट्विटर अकाउंटही आहे. फेसबुक वापरणारी व्यक्ती कार्यकर्त्यांशी संवाद साधत होती, फ्रेंडशिप रिक्वेस्ट स्विकारत होती. तसेच काही ठिकाणी दिशाभूल करणारे संदेश या अकाऊंटच्या माध्यमातून टाकण्यात येत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर मनसेचे प्रवक्ते सचिन मोरे यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर सेलच्या मदतीने या प्रकरणाचा तपास करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले. सोशल नेटवर्किंग साईटसवरची ही सर्व अकाऊंटस बंद करावीत अशी मागणी मनसेतर्फे करण्यात आली आहे.