महाराष्ट्र आणि हरियाणात सत्ता स्थापनेसाठी निरीक्षक पाठविण्याचा निर्णय भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत घेण्यात आल्याचे भाजपचे नेते जे.पी.नाडा यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
महाराष्ट्रात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंह यांच्यासोबत जे.पी.नाडा हे निरीक्षक म्हणून येणार असून सत्तास्थापनेसाठीची चर्चा आणि राज्याच्या मुख्यमंत्री पदासाठीचे नाव देखील यावेळी निश्चित करण्यात येणार आहे. तर, हरियाणामध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि भाजपचे नेते दिनेश शर्मा हे निरीक्षक म्हणून जाणार आहेत. दिल्लीतील भाजपच्या मुख्य कार्यालयात अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान मोदी यांच्या उपस्थितीत पक्षाच्या संसदीय समितीची ही बैठक झाली.
दरम्यान, भाजपच्या संसदीय समितीची बैठक सुरू असताना भाजप नेत्याने उध्दव ठाकरेंना फोन केला असल्याच्या चर्चेलाही जे.पी.नाडा यांनी यावेळी पूर्णविराम दिला. संसदीय समितीच्या बैठकीतून अशाप्रकारचा कोणताही फोन भाजपकडून करण्यात आलेला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.