कालपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कौतुक करणारे रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी आता त्यांच्यावर आरोप करण्यास सुरुवात केलीये. रिपब्लिकन पक्षातील नेते अर्जुन डांगळे यांनी रामदास आठवले यांची साथ सोडून शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय सोमवारी घेतला. ‘मातोश्री’वर जाऊन डांगळे यांनी उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. त्याचवेळी दुसरीकडे आणखी एक नेते काकासाहेब खंबाळकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमागे आपली ताकद लावण्याचा निर्णय घेतला. या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना रामदास आठवले यांनी शिवसेना आमच्या पक्षात फूट पाडत असल्याचा आरोप केला.
भाजपच्या नेतृत्त्वाखाली महायुतीसोबत जाण्याचा निर्णय अर्जुन डांगळे यांच्याशी चर्चा करूनच आपण घेतला होता. त्यांनीच भाजपसोबत जाणे अधिक योग्य ठरेल, असे म्हटले होते, असे रामदास आठवले यांनी सांगितले. मात्र, आता उद्धव ठाकरे आमच्या पक्षात फूट पाडत आहेत. शिवसेनेने अशी भूमिका घेता कामा नये. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली पाहिजे, असे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते. भीमशक्ती त्यांच्यासोबत आल्यावरच बाळासाहेबांचे स्वप्न साकार झाले होते. आम्ही त्यांना साथ दिल्यावरच मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आली होती, असे रामदास आठवले यांनी सांगितले.