रिपब्लिकन पक्षाने भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी स्वतः याची घोषणा केली. त्यांच्या पक्षासाठी भाजपने विधानसभेच्या आठ जागा दिल्या असून, त्यांच्या पक्षातील दोघांना विधान परिषदेवर घेण्याचेही आश्वासन दिले आहे.
शिवसेनेशी असलेली युती तुटल्यानंतर रामदास आठवले यांचा रिपब्लिकन पक्ष कोणासोबत जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गेल्या दोन दिवसांपासून आठवले यांच्या भाजपच्या नेत्यांसोबत जागावाटपावरून चर्चा सुरू होती. अखेर शनिवारी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत आठवले यांची चर्चा झाल्यानंतर त्यांनी भाजपसोबत राहण्याचा निर्णय घेतला. रिपब्लिकन पक्षाला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपद, विधान परिषदेवर प्रतिनिधित्व आणि राज्यातील महामंडळावर प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन अमित शहा यांनी आपल्याला दिले असल्याचे आठवले यांनी पत्रकारांना सांगितले.