महायुतीत फूट पडल्यानंतर शिवसेनेबरोबर जायचे की भाजपसोबत रहायचे, याचा निर्णय अजून रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी घेतलेला नाही. दोन्ही पक्षांबरोबर जागावाटप व सत्तेतील वाटा किती मिळणार यावर चर्चा सुरु आहे. आठवले यांना भाजपकडून केंद्रातील मंत्रिपदाचे लेखी आश्वासन हवे आहे. त्यासाठीच पाठिंब्याचा निर्णय त्यांनी एक दिवस लांबणीवर टाकला आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आठवले यांनी गुरुवारी रात्री भेट घेतली. त्यावेळी त्यांना शिवसेनेसोबत राहण्याचे आणि महाराष्ट्रात सत्ता मिळाल्यास उपमुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तर दुसऱ्या बाजूला भाजपनेही आठवले यांना केंद्रातील मंत्रीपदाचे गाजर दाखविले आहे. त्यामुळे शुक्रवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल, त्यांनी असे जाहीर केले होते. परंतु त्यांनी आता आज शनिवारी निर्णय जाहारी करु असे सांगितले.
आठवले एकाच वेळी दोन्ही पक्षांबरोबर सत्तेतील वाटा आणि जागवाटपाची बोलणी करीत आहेत. भाजपकडे त्यांनी ३० ते ३५ जगांची यादी दिली आहे. भाजपकडून २० ते २२ जागा रिपाइंला मिळतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेकडून त्यांना आणखी जास्त जागा मिळू शकतात. परंतु शिवसेनेकडून त्यांना उपमुख्यमंत्रीपदाचे व भाजपकडून केंद्रीतील मंत्रीपदाचे लेखी आश्वासन हवे आहे. दोन्ही पक्षांकडे दोन-दोन एमएलसीची मागणी करण्यात आली आहे. ज्यांच्याकडून पक्षाला जास्त लाभ होईल, त्यांच्याबरोबर जाण्याचे संकेत आठवले यांनी दिले. त्याबद्दलचा निर्णय आज शनिवारी जाहीर करण्यात येणार आहे.