विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणुका लढविल्या तर आमचे उमेदवार निवडून येऊ शकत नाहीत, अशी कबुली देऊन भाजप शिवसेनेच्या नेत्यांनी निवडून येणाऱ्या जागांबाबत आमचा विचार करावा असे मत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
रामदास आठवले विदर्भाच्या दौऱ्यावर आले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाबाबत महायुतीचा निर्णय होत नसल्यामुळे आम्हाला कोणत्या जागा दिल्या जातात, हे कळायला मार्ग नाही. आमचे अनेक कार्यकर्ते निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. राज्यात २० जागांची मागणी केली असून त्यात विदर्भातील १२ जागांचा समावेश आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेऊन त्यांच्याकडे जागेची मागणी केली आहे. राज्यात रिपब्लिकन पक्षाला सोबत घेतल्याशिवाय महायुतीला आणि आम्हाला युतीसोबत राहण्याशिवाय पर्याय नसल्याने त्यांनी आमचा विचार करावा आणि आम्ही त्यांचा विचार करू. राष्ट्रवादीसोबत असताना त्यांनी आमचा घात केला होता. मात्र, महायुतीत तसे होऊ नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.