शिवसेना-भाजप या विरोधात धर्माध किंवा जातीयवादी शक्ती असल्याचा प्रचार करुन आंबेडकरी समाजाला महायुतीच्या विरोधात उभे करून रामदास आठवले यांच्या शिवेसना-भाजपबरोबरील युतीमुळे संभ्रमावस्थेत सापडलेल्या दलित मतदारांचे ध्रुवीकरण करण्याची रणनीती रिपब्लिकन सेनेचे प्रमुख आनंदराज आंबेडकर यांनी आखली आहे. आठवलेंच्या खेळीनेच आठवलेंच्या राजकारणाला शह देण्याची आनंदराज यांचे डापवेच  असल्याचे मानले जात आहे.  
रामदास आठवले यांनी कॉंग्रेसच्या मदतीने शिवसेना-भाजपविरुद्ध जातीयवादाचा प्रचार करीत सत्तेत वाटा मिळविला. पुन्हा सत्तेसाठीच त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जातीयवादी म्हणत शिवसेना-भाजपच्या छावणीत प्रवेश केला. शिवसेना-भाजपच्या विरोधात मानसिकता तयार झालेल्या आंबेडकरी समाजाची त्यामुळे मोठी कोंडी झाली. त्याचवेळी इंदू मिलच्या आंदोलनामुळे प्रकाश झोतात आलेल्या आनंदराज आंबेडकर यांनी रिपब्लिकन सेनेशी आंबेडकरी तरुणांना जोडण्याचा प्रयत्न केला. परंतु राजकारणाच्या मैदानात त्यांच्या समोर पर्याय मिळाला नाही. परिणामी स्थानिक स्वराज्य संस्था ते लोकसभा निवडणुकीत आंबेडकरी समाजातील मतांचे विभाजन झाले. आता पुन्हा आनंदराज यांनी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. आनंदराज यांनी सुधीर सावंत, बी.जी. कोळसे-पाटील, प्रदीप ढोबळे, दिगंबर राठोड, यांना त्यांच्या पक्ष-संघटनांसहबरोबर घेऊन संविधान मोर्चाची स्थापना केली आहे. ओबीसी बांधव बुद्ध धम्माच्या वाटेवर या अभियानामुळे आंबेडकरी समाजाशी भावनिक नाते जोडणारे हनुमंत उपरे यांनाही त्यांनी सोबत घेतले आहे. शुक्रवारी पत्रकार परिषदेत आनंदराज यांनी संविधान मोर्चा स्थापनेची घोषणा केली. शेकाप, भाकप, माकप, जनता दल यांच्या डाव्या समितीशी समझोता झाला आहे.