ठाणे महापालिकेच्या महापौर पदासाठी सत्ताधारी शिवसेनेकडून वागळे इस्टेट परिसरातील ज्येष्ठ नगरसेवक संजय मोरे यांचा अर्ज शुक्रवारी दाखल करण्यात आला. नारायण राणे समर्थक रिवद्र फाटक यांच्यासह काँग्रेसच्या सात नगरसेवकांनी नुकताच शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे येत्या १० सप्टेंबर रोजी होणारी महापौर निवडणुकीची केवळ औपचारिकता शिल्लक राहीली आहे.
उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून कळव्याचे नगरसेवक राजेंद्र साप्ते यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस पक्षाकडून विक्रांत चव्हाण आणि नगरसेविका मेघना हंडोरे यांनी अनुक्रमे महापौर, उपमहापौरपदासाठी अर्ज दाखल केले. राजन विचारे यांची लोकसभेवर निवड झाल्यामुळे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून महापालिकेतील दिग्गज नगरसेवक इच्छुक आहेत. त्यामुळे कधी नव्हे ते ‘महापौर पद नको’, असा सूर या ज्येष्ठ नगरसेवकांमधून व्यक्त होताना दिसत होता. त्यामुळे संजय मोरे यांची या पदासाठी लॉटरी लागल्याची चर्चा शुक्रवारी महापालिका वर्तुळात होती. वागळे परिसरातून तीन वेळा निवडून आलेले मोरे हे आमदार एकनाथ िशदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे ठाणे शिवसेनेतील िशदे यांच्या वरचष्म्यावर मातोश्रीवरुन पुन्हा एकदा मोहर उमटविल्याचे स्पष्ट झाले आहे.
फाटक यांच्या बंडखोरीमुळे महापालिकेतील काँॅग्रेस-राष्ट्रवादी-मनसे अशा आघाडीचे संख्याबळ ६५ वरुन थेट ५८ वर आले आहे. स्वत फाटक आणि त्यांच्या नगरसेविका पत्नीने राजीनामा दिल्याने आघाडीच्या आव्हानातील हवा निघून गेली आहे. युतीमधील सत्तावाटपाच्या सुत्रानुसार पुढील वर्षी स्थायी समिती सभापतीपद भाजपच्या वाटय़ाला येणार आहे. त्यामुळे उपमहापौरपदी शिवसेनेकडून साप्ते यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 6, 2014 3:51 am