मुलुंड विधानसभा मतदार संघातून विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करणाऱ्या आणि पुन्हा एकदा आपले राजकीय भवितव्य आजमावण्यासाठी सज्ज झालेल्या आमदार तारासिंग यांच्या श्रीमंतीमध्ये गेल्या पाच वर्षांत तब्बल दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. सर्वसामान्यांचा आमदार म्हणून ओळखले जाणाऱ्या तारांसिंग यांची मालमत्ता ७ कोटीवरून चक्क  १९ कोटी झाली आहे. सरदार तारासिंग यांनी सन २००९च्या विधानसभा निवडणुकीत आपली स्थावर आणि जंगम अशी ७ कोटींची मालमत्ता असल्याचे नमूद केले होते. त्यामध्ये विविध बँकांमधील २ कोटींच्या ठेवी, १३ लाखांचे ९२ तोळे सोने आणि पाच कोटींची स्थावर मालमत्ता असल्याचे नमूद केले होते. यावेळी मात्र त्यात कमालीची वाढ झाली आहे.तारासिंग दांपत्याकडे ५ कोटींची जंगम संपत्ती आहे. त्यामध्ये ११ लाखांच्या गाडय़ा आणि ९२ तोळे सोन्याचा समावेश आहे. तर पडघा येथील ६० लाखाची जमीन, भांडूप, मुलुंड येथील घर आणि लोणावळा येथील बंगला अशी १२ कोटींची स्थावर मालमत्ता आहे.