पंचवीस वर्षे एकत्र संसार केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने शिवसेनेशी काडीमोड घेतला आणि त्याच वेळेस काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पंधरा वर्षांची आपली लिव्ह-इन रिलेशनशिप थांबविली. चारही पक्षांनी या निर्णयाची घोषणा करण्यासाठी संपूर्ण पितृपक्षाची वाट पाहिली आणि दरम्यानच्या काळात जनतेचे मनोरंजन करण्यात कोणतीही कसूर ठेवली नाही, याबद्दल त्यांना धन्यवादच दिले पाहिजेत.
आता ही फारकत घेण्यासाठी कोण कारणीभूत होते आणि एकोपा राखण्यासाठी कोणी प्रयत्नांची शिकस्त केली, याचे चर्वितचर्वण होत राहील. निकालानंतर जेव्हा सगळ्यांना एकत्र यावे लागेल आणि आपापला नवीन जोडीदार निवडण्याची वेळ येईल, तोपर्यंत या घडामोडीचे रवंथ चालू राहील. सगळेच जण वेगवेगळे झाल्यामुळे कोणाला काय फायदा होईल, ही चर्चा वेगळी. मात्र केंद्रातील सत्ताधारी पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाला याचा सर्वात मोठा फटका बसणार आहे, हे निश्चित. मोठ्या मुश्किलीने मोदी यांनी कमावलेला जनतेचा विश्वास गमाविण्यासाठी ही मंडळी सज्ज झाली आहेत.
कालपर्यंत शिवसेनेच्या खांद्यावर बसून भाजपची मंडळी महाराष्ट्रात वावरत होती. त्यासाठी कोणताही अपमान, कितीही उपहास सहन करावा लागला, तरी भाजपवाल्यांनी त्याबद्दल कधी अवाक्षर काढले नाही. सत्यनारायणाच्या कथेतील गरीब ब्राह्मणाला ज्याप्रमाणे अचानक घबाड सापडते त्याप्रमाणे दोन वर्षांपूर्वी भाजपचे ग्रह फिरले आणि मोदी नावाचा तारा त्यांना मिळाला. आधीची ग्रहदिशा फिरली आणि भाजपला चांगले दिवस आले. त्यामुळे भाजपला आपल्या बळाचीही जाणीव झाली आणि स्थानाचीही. भाऊ छोटा असला म्हणून काय झाले, त्याचाही कधीही स्वतंत्र संसार सुरू होतो आणि तो बापाच्या संपत्तीत वाटा मागायला लागतो. बाळ ठाकरे, प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या वडिलधाऱ्यांनी जे कमावून ठेवले त्याची वाटणी त्यांच्यानंतरच्या वारसदारांनी मागितली.
मोठ्या भावाला तर नेहमीच आपल्या मोठेपणाचा तोरा होता. संपत्तीत वाटा मागितल्यानंतर हा तोरा आणखीच वाढला. मग आपल्याशिवाय घर चालणार नाही, हेही मोठ्या भावाने सांगून पाहिले. मात्र ‘मनी नाही भाव’ अशा अवस्थेतील या भावांचे एकत्र राहणे यापुढे शक्यच नव्हते. घरात छोटा असणारा भाऊ ऑफिसमध्ये साहेब व्हावा आणि मोठ्या भावाला त्याच्या हाताखाली काम करावे लागावे, तेव्हा जी परिस्थिती होईल, तीच या दोन्ही पक्षांची झाली.
भाजपच्या दुर्दैवाने त्याचे इतरत्रही भाऊ आहेत आणि त्यांच्याशी त्याचे संबंध असेच बिघडले आहेत. पंजाबमधील शिरोमणी अकाली दल आणि हरियाणातील हरियाणा जनहित काँग्रेस यांच्याशी भाजपची लोकसभा निवडणुकीपर्यंत युती व्यवस्थित चालू होती. मात्र मोदींना एकहाती सत्ता मिळाली आणि पंजाब व हरियाणातील युतीही संकटात सापडल्या. त्यातील हरियाणात तर अगोदरच युती संपुष्टात आली आहे.
एकेकाळी २२ पक्षांचे कडबोळे घेऊन सत्ता चालविणाऱ्या भाजपला आता मित्र असे राहिले नाहीत. तमिळनाडूतील वैगोंनी आधीच वेगळी वाट धरली आहे, आंध्रातही चंद्राबाबू आणि भाजपचे म्हणावे तेवढे सख्य नाही. तेव्हा आता भाजपच्या जहाजात जे प्रवासी आहेत ते सगळे एक-दोन जागांचे धनी आहेत. चंद्रप्रकाशावर आयुष्य काढणाऱ्या चकोराप्रमाणे सत्तेच्या मिळेल त्या वाट्यावर तग धरणारे असे हे पक्ष आहेत. अगदी महाराष्ट्रातही राजू शेट्टी, महादेव जानकर आणि विनायक मेटे हे त्यांचे सहप्रवासी लोकसभा-विधानसभेच्या एखाद-दुसऱ्या जागेचेच वहिवाटदार आहेत.
अशा अवस्थेत शिवसेनेसह अन्य पक्षांना केवळ स्वतःच्या पडत्या काळात सोबत घेऊन गरज सरल्यावर त्या वैद्याला वाऱ्यावर सोडण्याची भाजपची वृत्ती आहे काय, असा प्रश्न यामुळे निर्माण होऊ शकतो. भाजपच्या विश्वासार्हतेवरच यामुळे प्रश्न निर्माण होऊ शकतो.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विश्वासार्हतेबद्दल आनंदीआनंदच आहे. काँग्रेसबद्दल बोलण्याचीच सोय नाही. १९७०च्या दशकात एका रात्रीत वसंतदादांना तोंडघशी पाडून मुख्यमंत्री बनणारे शरद पवार राष्ट्रवादीचे नेते. त्या घटनेमुळे पवारांबद्दल अविश्वास निर्माण झालेला केंद्रीय पातळीवरील अविश्वास आजही दूर होऊ शकलेला नाही.
शिवसेना हे तर पक्ष नव्हे, कुटुंबच! युती होताना ज्यांचा जन्मही झाला नव्हता ते आदित्य ठाकरे युती तुटण्याबद्दल अधिकृत प्रतिक्रिया देतात, यातच युती टिकविण्याची गरज शिवसेनेने किती गांभीर्याने स्पष्ट होते. युती तुटल्याने सर्वात जास्त फायदा कोणाचा होईल, हे सांगता येणार नाही. मात्र सर्वात जास्त नुकसान शिवसेनेचे होईल, यात शंका नाही.
अशा अवस्थेत राज्याला पर्याय देऊ शकण्याचा दावा करणाऱ्या पक्षाने सत्ता येण्याआधी थोडे जबाबदारीचे भान सोडावे, हे समजण्याच्या पलीकडे आहे. विनोद तावडेंसारखे लोक निवडणुकीच्या एक महिना आधीच मी गृहमंत्री होणार, असे म्हणतात, हे काय राजकीय परिपक्वतेचे प्रदर्शन म्हणायचे? मग निवडणुकीसाठी मुख्यमंत्री म्हणून स्वतःला पुढे आणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना भाजप कोणत्या तोंडाने दोष देणार? लोकसभा निवडणुकीत मोदींची लाट नसून स्वतःच्या बळावर जागा जिंकण्याचा आणि भाजपच्या विजयातही मदत करण्याचा उद्धव ठाकरे यांचा दावा हास्यास्पद खराच. पण मग १० जागांसाठी मागे-पुढे करणाऱ्या पक्षाबद्दल काय बोलावे?
अन् मुख्य म्हणजे भाजपला आपले बळ वाढल्याचे कशावरून वाटते? बबनराव पाचपुते, भास्करराव पाटील खतगांवकर, सूर्यकांता पाटील यांच्या आधारे? अगदी अलीकडे पिंपरी चिंचवडमधील बेकायदा बांधकामांचे तारणहार लक्ष्मण जगताप भाजप एक्स्प्रेसमध्ये सामील झाले. कालपर्यंत हे भाजपचे दुरित होते आणि भगवे पट्टे अंगावर चढविले, की आज त्यांचे तिमिर गेले असे जनतेने समजून घ्यायचे. शिवाय उद्या राष्ट्रवादीशी लगट करण्याची किंवा मनसेशी हातमिळवणी करण्याची पक्षाची तयारीही सगळ्यांच्या डोळ्यात आली आहे. तेव्हा लोकांनी भाजपला पर्याय म्हणून निवडून द्यावे, का काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनंतर राज्यात नाकर्तेपणा दाखविण्याची, मुजोरी आणि लूट करण्याची संधी यांनाही द्यावी म्हणून निवडून द्यावे?
शिवसेनेला सोडून भाजपने स्वतःच्या कर्तृत्वावर जनतेचा कौल मागितला असता, तर तेही समजण्यासारखे होते. मात्र सर्व प्रकारचे विक्रीयोग्य भुंगे जमा करून तो पूजेसाठी कमळ आणल्याचे भासवू पाहत असेल, तर त्यावर शत प्रतिशत अविश्वास करावाच लागेल.
– देविदास देशपांडे
devidas@didichyaduniyet.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)