महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचे वेळापत्रक लागल्यानंतरच्या दोन आठवड्यात मधमाशांचे मोहोळ उठावे, तशा घटना घडून गेल्या व त्याच्या पाठोपाठ खूप मोठ्या प्रमाणावर उलथापालथीही झाल्या. त्यामुळे मतदारांपुढे प्रश्न पडला आहे की आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होतील! पक्षनिहाय विचार केल्यास काँग्रेसतर्फे सध्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे तर आहेतच पण त्यांच्याबरोबर नारायण राणे यांच्यासारखे काही उमेदवारही असतीलच. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे फक्त अजित पवार यांचेच नाव सध्या तरी ऐकू येत आहे. शिवसेनेतर्फे खुद्द उद्धव ठाकरे किंवा त्यांनीच निवडलेला कुणी पुनर्निर्वाचित आमदार असेल. जरी देवेंद्र फडणवीस यांचे नाव अधून-मधून घेतले जात असले तरी आजच्या घटिकेला तरी भाजपतर्फे कुठलाच ठळक उमेदवार नजरेसमोर येत नाही.
नारायण राणे यांचा जन्म १९५२ साली झालेला असून, आज ते ६२ वर्षांचे आहेत. त्यांना कोकणचे श्रेष्ठ नेते मानले जाते. आर्थिकदृष्ट्या अतिशय साध्या परिस्थितीत जन्मलेले राणे तरुणपणीच राजकारणात उतरले व आपल्या संघटना कौशल्यामुळे, नेतृत्वगुणांमुळे व धीट स्वभावामुळे शिवसेनेमध्ये त्यांची झपाट्याने प्रगती झाली व ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचले. पुढे ते शिवसेनेतून बाहेर पडले व त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तेव्हापासून त्यांनी उद्योग, महसूल इत्यादी महत्त्वाची मंत्रिपदे भूषविली आहेत.
राजकीय प्रवास
सुरुवातीला सुभाषनगर येथील कनिष्ठ उत्पन्न गटासाठी बनविलेल्या सदनिकेत राहणारे राणे मित्रांबरोबरच्या भागीदारीत एक छोटेसे दुकान चालवत. त्यांच्या विशीतच त्यांनी चेंबूरचे शाखाप्रमुख म्हणून शिवसेनेत प्रवेश केला. सिंधुदुर्ग तालुक्यात त्यांनी शिवसेनेची संघटना बांधण्याचे कार्य अतिशय कष्ट घेऊन केले व अनेक तरुण कार्यकर्ते शिवसेनेला मिळवून दिले. त्यांचे नेतृत्वगुण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हेरले व त्यामुळे त्यांची शिवसेनेत खूप जलद प्रगती झाली. कालांतराने छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने निर्माण झालेल्या पोकळीत त्यांनी प्रवेश केला व १९९९मध्ये मनोहर जोशी मुख्यमंत्रीपदावरून बाजूला झाल्यावर त्यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद देण्यात आले.
पण त्यांचे खरे सामर्थ्य दिसले ते २००५ पर्यंत विरोधी पक्षाचे नेतृत्व करताना! ते अतिशय अभ्यासू आहेत व विधानसभेचे व सरकारचे काम कसे चालते आणि राजकारणात काय काय डावपेच कसे खेळले जातात याचे अतिशय सूक्ष्म व सखोल ज्ञान त्यांना आहे. थोडक्यात या विषयाचे ते एक ‘पंडित’च आहेत! काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या आघाडीचे राज्य असताना ते विरोधी पक्षनेते होते व ते तत्कालीन सरकारला सळो की पळो करून टाकत. त्यामुळे तत्कालीन सत्ताधारी पक्षातील नेते ‘आता राणे आपल्या पोतडीतून काय काढतील व आपल्याला कुठल्या नव्या डोकेदुखीत टाकतील’ याच्या काळजीतच असत! थोडक्यात विरोधी पक्षनेतेपदाची त्यांची कारकीर्द खूपच गाजली!
त्याच सुमाराला सध्या शिवसेनेच्या अध्यक्षपदावर असलेल्या व त्यावेळी कार्यकारी अध्यक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचे मतभेद सुरू झाले. पुढे ते विकोपाला गेल्यावर २००५ साली राणे शिवसेनेतून बाहेर पडले व त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राज्याचे महसूलमंत्रीपद त्यांना देण्यात आले. शिवसेनेच्या तिकिटावर जिंकलेल्या आपल्या आमदारकीचाही राजीनामा देऊन त्यांनी लोकशाहीच्या दृष्टीने एक चांगला पायंडा पाडत मालवणहून विधानसभेची निवडणूक लढवली. ते खूप मोठ्या मताधिक्याने निवडून तर आलेच पण त्या निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या उपरकर यांचा इतका दारुण पराजय केला की त्यांची अनामत रक्कमही जप्त झाली. शिवसेनेच्या इतिहासात एका बंडखोर नेत्याने निवडणुकीत असा विजय मिळविल्याचे हे पहिलेच उदाहरण झाले.
राणे-उद्धव ठाकरे यांच्यामधील मतभेदाबद्दल अलीकडे आपण खूप वाचत असलो तरी या बाबतीतील एक वैयक्तिक आठवण मी इथे सांगतो. २००३-२००४ दरम्यान मी गोव्याला काम करत असताना एकदा विमानाने मुंबईहून गोव्याला जात होतो. त्या विमान-प्रवासात माझ्या शेजारच्या आसनावर उद्धव ठाकरे बसले होते. आधीची कसलीच ओळख नसल्यामुळे मी जरासा सावधपणेच त्यांच्याशी बोलू लागलो, पण लवकरच आमचे सूर जमले व छान गप्पा झाल्या. ‘स्वभावाने अतिशय साधे गृहस्थ’ असाच त्यांच्याबद्दल माझा ग्रह झालेला होता. ते कुठे चालले आहेत या माझ्या प्रश्नाला त्यांनी सांगितले की ते कणकवलीला राणेंना भेटायला व धीर द्यायला चालले होते कारण राणे यांचे घर कुण्या प्रतिपक्षातील नेत्यांनी जाळले होते! यावरून त्यावेळी तरी उद्धव व राणे यांचे संबंध चांगलेच असावेत असे मला वाटते. पुढे कदाचित राजकीय महत्वाकांक्षांमुळे त्यांच्यात दरी निर्माण झाली असेल व त्याचा परिणाम म्हणून राणे शिवसेनेतून बाहेर पडले असतील!
राणे यांची राजकीय वाटचाल नेहमीच वादविवादात गुरफटलेली आहे. ते आपल्या तसेच विरोधी पक्षातल्या नेत्यांबरोबर नेहमीच ’पंगा’ घेताना दिसतात. त्यामागची कारणमीमांसाही ते जनतेपुढे वा आपल्या पक्षश्रेष्ठींपुढे व्यवस्थितपणे ठेवताना दिसत नाहीत. त्यामुळे ’कुणाशीही न पटणारा नेता’ अशी त्यांची प्रतिमा जनमानसात झालेली आहे व ती बदलण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असे कुणालाही वाटेल!
१९९९ साली नारायण राणे मुख्यमंत्री झाले तरी कसे? त्यासाठी त्यांना बाळासाहेब ठाकरे यांचे मनापासून आभार मानायला हवेत! बाळासाहेबांचा शिवसेनेत (आणि मुंबईतही) असा काही दरारा होता की एकदा त्यांनी कुठलाही निर्णय घेतला की तो ‘शेवटचा शब्द’च असे. एक काळ असा होता की शिवसेनेने डच्चू दिलेले नेते थेट ‘राजकीय अज्ञातवासा’तच जायचे. पण अलीकडे शिवसेनेतून बाहेर पडूनही राजकारणातून बाहेर फेकले न गेलेले छगन भुजबळ व नारायण राणे हे नेते त्याला अपवाद ठरले आहेत. म्हणजे या दोन नेत्यांमध्ये स्वतःची अशी शक्ती आहे हे नक्की!
पण स्वत:च्या बळावर नारायण राणे मुख्यमंत्री होऊ शकले असते काय याचे उत्तर नकारार्थीच द्यावे लागेल. कारण काँग्रेससारख्या पक्षात असूनही वरिष्ठांकडे हट्ट धरून म्हणा, स्वबळावर म्हणा वा ‘हाय कमांड’ची मर्जी राखून म्हणा, अद्याप तरी मुख्यमंत्रीपदाचा मान त्यांना मिळू शकलेला नाही.
एक महत्वाची गोष्ट ही आहे की शिवसेनेचे नेते आपले राजकीय काम स्वबळावर करून घेतात, त्यासाठी प्रसंगी आरडा-ओरडा करायला मागे-पुढे पाहात नाहीत. पण काँग्रेसची संस्कृती अगदी वेगळी आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे काँग्रेसचे आतापर्यंतचे मुख्यमंत्री! एक काळ असा होता की महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मुंबईतच निवडला जायचा. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण (पहिली ‘पारी’), वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यापर्यंत ही पद्धत चालू होती. पण त्यानंतर मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मुंबईत निवडले जाण्याऐवजी दिल्लीहून ‘नेमले’ जाऊ लागले. म्हणजेच ‘स्वयंप्रकाशित’ (elected) मुख्यमंत्र्याऐवजी ‘परप्रकाशित’ (selected) मुख्यमंत्री मराठी माणसाला सोसावे लागू लागले. या अनिष्ट प्रथेची सुरुवात अंतुले व बाबासाहेब भोसले यांच्यापासून झाली. (गंमत म्हणजे दुष्काळावर अजित पवारांनी सुचवला होता अगदी तस्साच ‘उपाय’ बाबासाहेबांनीही सुचवला होता! अजितदादा वाचले पण भोसले यांना मात्र मुख्यमंत्रीपदाला मुकावे लागले होते!) सध्याच्या काँग्रेस-राष्ट्रवादीपुरते बोलायचे झाले तर अजित पवार सोडले तर बाकी सारे नेते परप्रकाशितच आहेत. त्यात पूर्वीचे शंकरराव चव्हाण (दुसरी ‘पारी’), सुधाकरराव नाईक, सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख, अशोक चव्हाण व आताचे पृथ्वीराज चव्हाण हे सारे आले. थोडक्यात काँग्रेसमध्ये कुणाला आज मुख्यमंत्री व्हायचे असेल तर त्याच्या अंगात कर्तृत्व असो वा नसो, पण नेहरू-गांधी घराण्याशी एकनिष्ठा हवी आणि त्यांची पडतील ती कामे करायची तयारीही हवी. मग गांधी कुटुंबीयांची ‘कृपादृष्टी’ झाली की हुश्श! अशी अनेक उदाहरणे आपण मुख्यमंत्रीपदाचीच नव्हे तर राष्ट्रपतीपदापासून ते किरकोळ मंत्र्यांपर्यंतची पाहिलेली आहेत.
राणे यांचा पिंड असा ‘पडतील ती कामे करायचा’ असता तर ते शिवसेनेतून बाहेर पडलेच नसते. ते स्वयंभू नेते आहेत. कुणाच्या पाठगुळी वा खांद्यावर बसायची त्यांची संस्कृतीच नाही. म्हणून आजही ते मुख्यमंत्रीपदासाठी लाळघोटेपणा न करता ठणठणीत मागणी करत आहेत! त्यामुळे काँग्रेस पक्षात राहून ते मुख्यमंत्री होऊ शकतील काय हे एक मोठे प्रश्नचिन्हच आहे.
राणे आणि आगामी विधानसभा निवडणूक
शिवसेना-भाजप तसेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात फूट पडल्यामुळे राज्यात अस्थिर व अनाकलनीय राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता ‘काँग्रेस-मुक्त भारत’ची घोषणा कामी येऊन भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार की शिवसेनाच पुन्हा सर्वांत जास्त आमदारांचा पक्ष ठरणार, हे सांगणे आज तरी कठीण आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या राज्यकारभाराला विटलेल्या जनतेने यावेळी भाजप-शिवसेनेला घसघशीत विजय नक्कीच मिळवून दिला असता. पण आता या दुफळीमुळे सारेच अनिश्चित झालेले आहे.
आता विधानसभेत काँग्रेस पक्षाला किती जागा मिळतात यावर राणे यांच्यासकट सर्वच काँग्रेसच्या राजकीय नेत्यांचे भवितव्य अवलंबून आहे असे म्हटल्यास ते चुकीचे ठरणार नाही. तीच गत राष्ट्रवादी काँग्रेसची आहे! थोडक्यात या चार पक्षांचे किती उमेदवार निवडून येतील हे सांगणे या क्षणी तरी अशक्यच आहे!
– सुधीर काळे, जकार्ता
sbkay@hotmail.com
(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)