महाराष्ट्राचे आद्य पुरोगामी, पुरोगाम्यांचे शिरोमणी, (अ)जाणते राजे आणि ‘विदेशी’चा प्रखर तिरस्कार करणारे कट्टर राष्ट्रवादी नेते शरदराव पवार यांच्यातील संशोधकवृत्ती ऐन निवडणुकीच्या वक्तास नेहमीच खडबडून जागी होते. त्यांचे असे अवचित जागे होणे आणि जाती अंताचा लढा पुढे नेण्यासाठी (कि विशिष्ट जातींच्या अंतासाठी) सरसावणे महाराष्ट्रातील जनता-जनार्दनाला नवे नाही आणि आपण पवारांच्या संशोधनाला काही किंमतही देत नाही, हे महाराष्ट्रातील सुजाण मतदारांनी लोकसभा निवडणुकीत दाखवूनही दिले आहे. निवडणुकीच्या काळातच नेमके ठराविक जातीला लक्ष्य करून समाजाच्या उभारणीत असलेले त्यांचे योगदान नाकारण्याचा करंटेपणा करीत आणि बहुजनांचे राजकारण करीत असल्याच्या बाता मारीत केवळ ‘मराठा’ तितुका मेळवावा,चे उद्योग पवार आणि कंपनीकडून सुरू होतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांचे विजयादशमीचे बौद्धीक दूरदर्शनवरून थेट प्रक्षेपित केल्याच्या वादात पवारांनी दिलेली प्रतिक्रिया याच डोमकावळी मनोवृत्तीचा भाग आहे, असे म्हटल्यास चूक ठरणार नाही.
विजयादशमी किंवा दसरा या सणाला भारतीय संस्कृतीत एक महत्वाचे स्थान आहे. साडेतीन मुहूर्तातील एक महत्वाचा मुहूर्त म्हणून जसे त्याचे धार्मिक महत्व आहे, तसेच किंबहुना काकणभर जास्तच सामाजिक महत्व या सणाला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ साली दस-यालाच रा. स्व. संघाची स्थापना केली. हिंदूंना हिंदू म्हणून जगण्याची आणि हा देश हिंदूंचाच आहे, हा विश्वास देण्याची किमया रा. स्व. संघाने केली. या जाणिवजागृतीला विजयादशमीचेच अधिष्ठान होते. एका डॉक्टराने हिंदू समाजाच्या मनोवृत्तीचे निदान विजयादशमीला केले. तर, दुस-या डॉक्टरांनी याच विजयादशमीला अनोखी क्रांती घडवून जाती-पातीत पिचलेल्या आणि गावकुसाबाहेरचे जगणे नशीबी आलेल्या मोठ्या समुदायाला हे जोखड झुगारण्याची प्रेरणा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विजयादशमीलाच १९५६ साली धम्मचक्र परिवर्तन केले. या दोन्ही घटना नागपुरातच घडल्या आणि या दोन्ही घटनांचे भारतीय इतिहासातील महत्त्वही वादातीत आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी हिंगणा येथे झालेल्या जाहीर सभेत,’भाजपाला बाबासाहेबांपेक्षा भागवत प्रेम अधिक,’ अशी टीप्पणी करताना पवारांनी पुन्हा आपले जातीयवादी गरळ ओकले आहे. कारण येथे भागवत हा शब्द अडनाव म्हणून न वापरता विशिष्ट जातीकडे अंगुलीनिर्देश करण्यासाठीच पवारांनी वापरला आहे, हे न कळण्याइतकी जनता खुळी नाही. दूरदर्शनवर सरसंघचालकांचे भाषण दाखविल्यामुळे जगबुडी झाल्यासारखी छाती पिटून घेत डॉ. बाबासाहेबांचा अधिक्षेप झाल्याचा कांगावा करण्यामागे पवारांची हिच जातीयवादी ‘फोडा अन् झोडा’ नीती आहे, हे न कळण्याइतके कोणी दुधखुळे नाही. गडकरी, फडणविसांकडे सत्ता सोपवू नका, असे आवाहन करणे असो किंवा माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा ‘श्रीमंत’ असा उल्लेख करणे असो, पवारांची हीच मानसिकता सगळीकडे दिसते. सभ्य आणि सुसंस्कृत नेतृत्व असल्याचा आव आणत आणि आपल्या भाटांकडून सर्वसमावेशक असल्याची आरती ओवाळून घेत पवारांनी कायम हेच उद्योग केले आहेत आणि हिच त्यांच्या राजकारणाची पद्धत आहे. याच मनोवृत्तीने पुरोगामी महाराष्ट्र जातींच्या, पोटजातींच्या तटबंदीत विभागण्याचे पातक केले आहे. याच मनोवृत्तीने ब्रिगेडी भस्मासूर उभा केला आणि शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घेत महाराष्ट्र एका विशिष्ट जातीच्या दावणीला बांधण्याची खेळी केली.
एकीकडे थोरल्या साहेबांकडून भटजींना लक्ष्य केले जात असतानाच, त्यांच्या लेकीने शेटजींवर निशाणा साधला आहे. तीन वेळा दणदणीत विजय मिळवून गुजरातची सत्ता मिळविणारे आणि लोकसभा निवडणुकीत एकहाती विजय खेचून आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संभावना सुप्रियाताई सुळे यांनी ‘मोदीशेठ’ या शब्दांत केली आहे. पंतप्रधानांचा असा उल्लेख करताना सुप्रियाताईंना कोणावर निशाणा साधायचा आहे, हे स्पष्ट आहे.‘मोदीशेठ’वर तोंडसुख घेतांना आपल्या पिताश्रींनीही काही मोक्याच्या कामांसाठी शेठजींचीच नेमणूक केली आहे, हे त्या विसरलेल्या दिसतात. आपले निवडून येण्याचे वांधे असताना, इतके प्रचंड जनसमर्थन असलेल्या नेत्याबद्दल कसे बोलावे, याची शिकवणी ताईंनी लावलेली बरी. मुळात राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे एका विशिष्ट जातीचा पक्ष म्हणून पाहिले जाते. ठिकठिकाणच्या बाहुबली मराठा सुभेदारांची टोळी, असे या पक्षाचे स्वरूप आहे. सहकाराच्या स्वाहाकारातून आलेली सत्ता, मत्ता आणि बाहुबल या जोरावर यांचे राजकारण चालते. गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत या पक्षाचा जनाधार घसरत चालल्याचे स्पष्ट होत आहे. पवारांचे स्वबळ विधानसभेच्या ५२ ते ६० जागा इतकेच असल्याचे महाराष्ट्राने गेल्या दोन विधानसभा निवडणुकींत पाहिले आहे. यंदा हा आकडा आणखी खाली जाणार असल्याचे स्पष्ट आहे. पवार सत्तेशिवाय राहू शकत नाहीत, त्यामुळेच कसेही करून सत्ता हवी, यासाठीच त्यांच्याकडून जाती-पातीचे राजकारण खेळले जात आहे. मतदारराजा सुज्ञ आहेच. मात्र, रात्र वै-याची आहे, याची जाणिव करून देण्यासाठीच हा लेखनप्रपंच.

– विनय चाटी
vinay.chati@gmail.com

(वरील ब्लॉगमध्ये व्यक्त केलेली मते लेखकाची आहेत. ‘लोकसत्ता’ त्याच्याशी सहमत असेलच असे नाही)

jalgaon, raver lok sabha seat, eknath khadse, sharad pawar, ncp sharad pawar group upset, bjp, lok sabha 2024, sattakaran, election 2024,
खडसे यांच्या खेळीने शरद पवार गटात संतप्त भावना
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
NCP, sanjay Raut, sangli,
सांगलीत संजय राऊत यांच्या मदतीला राष्ट्रवादी का धावून गेली ?
मोहिते-पाटील यांच्या भूमिकेकडे साऱ्यांच्या नजरा