विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने, युती आणि आघाडीत रंगविले गेलेले धुसफूसनाटय़ संपले असून हाती असलेल्या मोजक्या कालावधीत मैदानात उतरण्याची आखणी करावी लागणार आहे. जागावाटपाच्या मुद्दय़ावरून अडलेले घोडे लगेचच मार्गी लावण्यासाठी सेना-भाजप-घटक पक्षांची महायुती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या तंबूत आता गांभीर्याने हालचाली सुरू झाल्या आहेत.
विधानसभेच्या २८८ जागांपैकी निम्म्या जागांसाठी शिवसेना-भाजपमध्ये सुरू असलेली रस्सीखेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई भेटीनंतरही संपली नव्हती. अमित शहा यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासमवेत रात्री उशीरा ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमही पार पाडला. यामुळे जागावाटपाच्या वादातून शिवसेना आणि भाजपमध्ये निर्माण झालेली तेढ संपली, पण वादाचा मुद्दा मात्र कायमच राहिल्याने, तिढा सुटला नव्हता. युती ‘टिको वा तुटो’ या बाण्याने आपापल्या निवडणूक नीतीची आखणीदेखील दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे करून ठेवली. ‘कामाला लागा’ असा आदेश भाजपने आपल्या पक्षांच्या इच्छुकांना दिला, सेनेच्या इच्छुकांनी तर प्रचार साहित्यदेखील वाटण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक मतदारसंघांमध्ये सेना-भाजपचे इच्छुक आमने सामने असल्याचे कालपर्यंत असलेले चित्र आज निवडणुका जाहीर झाल्यानंतर मात्र, पुसले जाणार आहे. अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची जवळपास दररोज रात्री उशीरा उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा सुरू होती. त्यामुळे तेढ कमी होण्यासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यास भाजपला यश आले. आता धुसफूसनाटय़ संपणार असून ‘महायुती’ म्हणूनच सारे घटक पक्ष कामाला लागतील, असा दावा भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी करू लागले आहेत.
आघाडीतही एकीचे सुर
 काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्येही जागावाटपाचा घोळ संपलेला नाही. मात्र, स्वबळाची भाषा मवाळ झाली असून, दोन्ही पक्ष एकत्र निवडणुका लढणार हे स्पष्ट झाल्याने, आघाडीतील धुसफूसनाटय़ावरही पडदा टाकला जाणार आहे. जागावाटपाचा तिढाही लवकरच सुटेल आणि संयुक्तपणे प्रचाराची आखणी केली जाईल, असे दोन्ही काँग्रेसचे नेते बोलू लागले आहेत. लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर लगेचच राज्यात होऊ घातलेल्या या निवडणुकीमुळे सत्ताधारी आघाडीला आपले स्थान टिकविण्याकरिता प्रचंड मेहनत करावी लागणार असून मतविभागणी टाळण्याकरिता एकत्रपणे निवडणुकीस सामोरे जाण्याखेरीज पर्याय नाही, हे केव्हाच स्पष्ट झाले असले, तरी निवडणुकीत स्वपक्षाचे बळ अधिक राहील यासाठी दोन्ही पक्षांची स्वतंत्र आखणी सुरू आहे.  काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार एकत्र होणार असला, तरी काँग्रेसचे केंद्रीय नेते राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांकरिता प्रचारात उतरणार किंवा नाही याबाबत मात्र अद्याप संदिग्धताच आहे. आघाडी झाल्यास दोन्ही पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी उभय पक्षांच्या उमेदवारांचा प्रचार करावा यासाठी काँग्रेस आग्रही असून, काँग्रेसचे केंद्रीय नेते राष्ट्रवादीच्या उमेदवारांकरिता प्रचारात सहभागी होतील, असे काँग्रेस सूत्रांचे म्हणणे आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील प्रचारात सहभागी व्हावे यासाठी काँग्रेस नेते प्रयत्नशील असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असलेल्या मतदारसंघांतही त्यांच्या प्रचार सभा आयोजित करण्याबाबत विचार सुरू असल्याचे या सूत्रांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारकाळात, राहुल गांधी यांच्या दौऱ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी ऐनवेळी गैरहजेरी लावल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या वेळी संयुक्त प्रचारात सर्व नेते सहभागी होतील, अशी शक्यताही या सूत्रांनी वर्तविली.