जागा वाटपाच्या संदर्भात पक्षाची अंतिम भूमिका काय आहे, हे आज उद्धव ठाकरेंना प्रत्यक्ष भेटून सांगितले. आता अंतिम निर्णय त्यांना घ्यायचा आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जागा वाटपाच्या संदर्भात शिवसेनेने जाहीरपणे दिलेला प्रस्ताव मान्य नसल्याचे भाजपने काल जाहीरपणे सांगितले होते. या घडामोडींमुळे आता युती होणार नाही, असे वातावरण राज्यात निर्माण झालेले असताना आज फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी भेटीचा पूर्ण तपशील देण्यास नकार दिला. ठाकरेंची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना पक्षाची भूमिका सांगितली आहे. जागा वाटपाच्या मुद्यावर अजूनही चर्चा करण्याची पक्षाची तयारी आहे. हा मुद्दा माध्यमातून चघळण्यापेक्षा चर्चेतून सोडवावा, अशी विनंती आज त्यांना केली आहे, असे फडणवीस म्हणाले. युती अभेद्य राहावी, अशी भाजपाची आजही भूमिका आहे. आता अंतिम निर्णय शिवसेनेला घ्यायचा आहे, असे सांगून फडणवीसांनी युती तोडण्याचे पातक पक्षावर येऊ नये, याची पुरेपूर खबरदारी घेण्याचा प्रयत्न आज केला.
..तर सर्व जागी भाजप लढणार-रुडी
नवी दिल्ली: शिवसेनेबरोबरची युती कायम राहावी अशी आमची इच्छा आहे. मात्र त्यांनी जर आम्हाला स्वबळावर जाण्यास भाग पाडले तर सर्व २८८ जागा लढण्याची तयारी असल्याचे महाराष्ट्र भाजपचे प्रभारी राजीव प्रताप रुडी यांनी स्पष्ट केले. शिवसेना-भाजपची गेली २५ वर्षांची युती अनिश्चित असतानाच रुडी यांच्या वक्तव्याला महत्त्व आहे. चित्रवाणी वाहिन्यांच्या माध्यमातून शिवसेना आम्हाला प्रस्ताव देत आहे, प्रत्यक्षात मात्र कोणताही ठोस प्रस्ताव देत नसल्याचा भाजप नेत्यांचा आरोप आहे. भाजप सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २० ते ३० जागा वगळता इतर ठिकाणच्या उमेदवारांची नावे पक्षाने तयारी केली आहे. काही ठिकाणी बाहेरच्या वजनदार व्यक्तींना भाजपची उमेदवारी दिली जाणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले. युती तोडण्याची आम्हाला इच्छा नाही, मात्र केवळ माध्यमांद्वारे प्रस्ताव देण्याची शिवसेनेची आडमुठी भूमिका आम्ही सहन करणार नाही, असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने स्पष्ट केले.