स्वतंत्र विदर्भ हा विधानसभा निवडणुकीमध्ये मुद्दाच नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी केले असले, तरी या मुद्दय़ामुळेच भाजपचा जाहीरनामा रखडल्याचे वृत्त आहे. भाजपचा छोटय़ा राज्यांच्या निर्मितीला पाठिंबाच आहे. मात्र या निवडणुकीत विदर्भाचा मुद्दाच नसून विकास साधायचा असेल, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे भ्रष्टाचारी सरकार उलथून टाकणे हे आमच्या पक्षाचे प्रमुख उद्दिष्ट आहे, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले.  
ज्येष्ठ भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्र विदर्भाची भूमिका घेतली आहे. तर, मी पंतप्रधान असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे पाडू देणार नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा भाजपचा डाव असल्याचा अपप्रचार होत असल्याने मोदी यांनी हे विधान केले होते. मात्र विदर्भ स्वतंत्र होणे, हे राज्याचे तुकडे पाडणे नाही. विकासासाठी छोटी राज्ये निर्माण करण्यास पाठिंबा असल्याची भाजपने सारवासारव केली आहे. मात्र स्वतंत्र विदर्भास शिवसेनेसह भाजपमधील अनेक नेत्यांचाही विरोध असून यावरुन अन्य महाराष्ट्रात भाजपविरोधी वातावरण तयार होऊ शकते. त्यामुळे स्वतंत्र विदर्भाच्या मागणीस पाठिंबा द्यायचा की विरोध करायचा, अशी भाजपची पंचाईत झाली आहे.
दरम्यान, नरेंद्र मोदी हे अतिशय प्रभावी नेते व पंतप्रधान असून त्यांची भाषणे लोकांना आवडतात, त्यामुळे ते प्रचारसभा घेत असल्याबद्दल कोणालाही आक्षेप असण्याचे कारण नाही, असे प्रसाद यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले. आधीच्या पंतप्रधानांना सभा घेण्यासाठी कोणी बोलावलेही नाही व ते प्रभावीही नव्हते, असे प्रसाद यांनी सांगितले.