दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर पक्षवाढीसाठी उध्दव यांची कष्ट करण्याची तयारी दिसून येते. त्यांनी महाराष्ट्रभर दौरे घेऊन पक्षाचा विस्तार केला, अशी स्तुतीसुमने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंवर रविवारी उधळली. लोकसभेत महाराष्ट्रात भाजपला मिळालेल्या यशात शिवसेनेचेही योगदान असल्याची वस्तुस्थिती आहे, असेही शरद पवार म्हणाले. ते मुंबईत ‘वार्तालाप’ कार्यक्रमात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केले.
* आर.आर.पाटील यांचे विधान निंदनीयच
राज्याचे माजी गृहमंत्री आर.आर.पाटील यांचे शनिवारचे वक्तव्य आक्षेपार्ह आणि निंदनीयच असून पक्षाच्या धोरणाशी विसंगत असल्याचे स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले. 
आर.आर.पाटील यांचे वक्तव्य चुकीचे असून भावनेत्या भरात त्यांच्याकडून असे विधान झाल्याची कबुलीही पाटील यांनी दिली आहे. तसेच केलेल्या विधानावर त्यांनी माफी मागितल्याने विषय वाढवू नये, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.
* महाराष्ट्र एकसंध रहावा हीच इच्छा
वेगळ्या विदर्भाचे वारे सध्या राज्यात जोरदार वाहत असल्याने या प्रश्नावर निवडणूक आयोगाने जनतेचा कौल घ्यावा आणि जनता जो निर्णय घेईल तिच भूमिका राष्ट्रवादीचीही राहील, असे शरद पवार यावेळी म्हणाले. मात्र, महाराष्ट्र कायम एकसंध रहावा अशीच इच्छा असल्याचेही ते म्हणाले.
* शिवाजी महाराजांच्या नावाने मत मागण्याची गरज नव्हती
‘छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद आणि चलो मोदी के साथ’ अशा घोषणा करून महाराजांच्या नावाने मत मागण्याची काहीच गरज नव्हती, अशा स्पष्ट शब्दांत पवार यांनी भाजपच्या जाहिरातींवर टीका केली. गुजरातमध्ये शालेय शिक्षणात शिवाजी महाराजांचा चुकीचा उल्लेख केला असल्याचेही पवार यावेळी म्हणाले.
* काँग्रेसमुळेच आघाडी तुटली
जागांची मागणी नेहमी सर्वोच्च जागांपासून होते म्हणून १४४ जागा राष्ट्रवादीने मागितल्या होत्या पण, १३० जागा लढविण्याचीच तयारी राष्ट्रवादीची होती. संपूर्ण २८८ जागा लढविण्यासाठी आम्ही तयार नव्हतो. त्यामुळे आघाडी रहावी अशी शेवटपर्यंत इच्छा होती, असे शरद पवार यावेळी म्हणाले. तसेच यापुढे सत्तेत कोणतेही पद स्वीकारणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.