विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी तुटली. कुणी किती जागा लढवायच्या यावरुन ही आघाडी तुटली असे वरकरणी सांगितले जात असले तरी, खरा वाद वेगळाच आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील जुने राजकीय हिशेब चुकते करण्यावरुन हा संघर्ष सुरु झाला आहे. त्यात आघाडीचा बळी गेला आणि आता राष्ट्रवादीने तर चव्हाणांना पुन्हा एकदा घेरले आहे. पवारांसारख्या नेत्याला खुले आव्हान देणाऱ्या पृथ्वीराजबाबांचेही राजकीय भवितव्य पणाला लागले आहे.  
ज्या वेळी महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार पहिल्यांदा स्थापन झाले, त्याचवेळी पवार-चव्हाण संघर्षांलाही सुरुवात झाली. १९६२पासून कराड लोकसभा मतदारसंघ पृथ्वीराज चव्हाण यांच्या घराण्याकडे होता. पृथ्वीराज यांचे वडील दाजीसाहेब चव्हाण यांनी १९६२ ते १९७१पर्यंत या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पुढे त्यांच्या मातोश्री प्रेमलाकाकी चव्हाण या १९७७ ते १९८९पर्यंत लोकसभेच्या खासदार राहिल्या. मध्ये फक्त १९८० चा अपवाद ठरला. त्यावेळच्या निवडणुकीत यशवंतराव मोहिते यांनी कराड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.
प्रेमलाकाकी यांच्यानंतर १९९१च्या निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांचा याच मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेत प्रवेश झाला. १९९६ व १९९८ मध्येही ते विजयी झाले. परंतु १९९९मध्ये शद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. तेव्हा एकाचवेळी लोकसभा व महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या. काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत झाली. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील या नवख्या उमेदवाराने पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठय़ा मताधिक्याने पराभव केला. हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागला होता. त्या निवडणुकीनंतर सत्तेसाठी काँग्रेस व राष्ट्रवादी राज्यत एकत्र आले. परंतु दहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पृथ्वीराज चव्हाण यांना महाराष्ट्रात मुख्यमंत्री म्हणून येण्याची संधी मिळाली, त्याचवेळी त्यांनी सरकारमधील भागीदार पक्ष असूनही राष्ट्रवादीच्या विरोधात आघाडीच उघडली.
मुंबईत जुलै २०११मध्ये बॉम्बस्फोटाची घटना घडली आणि कायदा व सुव्यवस्थेचे निमित्त करुन गृह खाते राष्ट्रवादीकडे ठेवण्याचा निर्णय चुकीचा ठरला, असे विधान करुन पहिल्यांदा त्यांनी राष्ट्रवादीवर हल्ला केला. राज्य बँकेवरील राष्ट्रवादीच्या वर्चस्वाला त्यांनी जोरदार धक्का दिला. पुढे तर सिंचन क्षेत्रावर श्वेतपत्रिका काढण्याचे जाहीर करुन त्यांनी राष्ट्रवादीकडील जलसंपदा खात्याच्या कारभाराला संशयाच्या पिंजऱ्यात उभे केले. पृथ्वीराजबाबांनी सिंचन घोटाळ्याचे आयते कोलीत विरोधकांच्या हातात दिले. राष्ट्रवादी आणि त्या पक्षाच्या नेतृत्वाच्या वर्मावर घाव घालणाऱ्या या साऱ्या घटना होत्या. आपली राजकीय कारकीर्द संपवायला निघालेल्या पवार यांच्या राष्ट्रवादीला त्यांनी धुडकावले. सत्ता गमावण्याची फिकीर त्यांनी केली नाही. राष्ट्रवादीनेही त्यांना चहुबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न केला. सरकारचा पाठिंबा काढून घेऊन त्यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हायला लावले. राष्ट्रवादीच्या उमेदवाराला माघार घ्यायला लावून आणि बंडखोर उमेदवार विलासकाका पाटील यांना पाठिंबा जाहीर करुन राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने पृथ्वीराजबाबांना पुन्हा एकदा कराडमध्ये घेरण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे शरद पवार यांना खुले आव्हान देणाऱ्या चव्हाण यांचीही यावेळी कसोटी आहे.