शिवसेनेची युती टिकविण्यासाठी शेवटपर्यंत प्रयत्न केले, हे दाखविण्यासाठी भाजपने नमती भूमिका घेत शिवसेनेकडे जागावाटपाचा नवीन प्रस्ताव पाठविला आहे. मात्र, त्याचवेळी ‘दरवेळी भाजपनेच मोठेपणा का दाखवायचा’ असा सवाल करत भाजप नेत्यांनी शिवसेनेला सुनावण्याची संधीही सोडली नाही. गेल्या अनेक निवडणुकीत शिवसेनेने ५९ जागा कायम गमावल्या, हा मुद्दाच शिवसेनेला अमान्य असून भाजपला अधिक जागा देण्याची सेनेची सुतराम तयारी नाही. तरीही युती तोडण्यासाठी शिवसेनेकडून पावले उचलली जावीत, यासाठी सकाळी भाजपच्या गोटात प्रतीक्षा सुरू होती.
भाजपचे प्रभारी ओम माथूर यांच्या अध्यक्षतेखाली सुकाणू समितीची प्रदीर्घ बैठक शुक्रवारी झाली. त्यात युतीसंदर्भातील व्यूहरचना आणि उमेदवार निश्चितीची प्रक्रिया पार पाडण्यात आली. शिवसेनेला जागावाटपाचा नवीन प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या नेत्यांनी आडून आडून शिवसेनेला खडसावले.
युती टिकविण्यासाठी भाजपने किती मोठेपणा दाखविला, याची जंत्रीच माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितली. प्रतिभाताई पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना शिवसेनेने ‘रालोआ’ चे घटकपक्ष असतानाही राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा दिला होता. शरद पवार पंतप्रधान व्हावेत, असे मत शिवसेनेकडून व्यक्त करण्यात आले होते. युतीमध्ये तणावाचे अनेक प्रसंग आले, तरीही राज्यातील जनतेचे हित लक्षात घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता घालविण्याच्या उद्दिष्टातून युती टिकविली, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांना सांगितले.
भाजपचा दावा सेनेला अमान्य
शिवसेनेने आतापर्यंतच्या अनेक निवडणुकांमध्ये ५९ जागा कायम गमावल्या आहेत, तर भाजप १९ जागांवर हरत आला आहे. त्यापैकी काही जागा भाजपला हव्या आहेत. मात्र भाजपचा हा दावा शिवसेनेने खोडून काढला आहे.
मतदारसंघांची पुनर्रचना २००९ मध्ये झाली आणि त्यावेळी मनसेचा प्रभाव होता व आता तो संपला आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीचा कोणताही विचार करु नये, अशी शिवसेनेची भूमिका आहे.  
भाजपचेच नुकसान का?
युती झाली, तेव्हा लोकसभेसाठी भाजपकडे ३२ व शिवसेनेकडे १६ जागा होत्या. गेल्या काही वर्षांत त्या कमी होत भाजपने २६ व शिवसेनेने २२ जागा लढविल्या. भाजपने लोकसभेच्या सहा आणि रिपब्लिकन पक्षासाठी राज्यसभेची एक अशा सात जागा दिल्या आहेत. भाजपचे खासदार निवडून आलेल्या जागा दिल्या असताना विधानसभेच्या जागांसाठी शिवसेना १६९ व भाजप ११९ हेच सूत्र कायम राहिले. आता भाजपला सूत्रापेक्षा अधिक जागा हव्यात, असे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले.