लोकसभेतील यशानंतर पुण्यातील सहाही जागा जिंकण्यासाठी विधानसभेच्या मैदानात उतरणाऱ्या महायुतीसाठी येणारी निवडणूक वाटते तेवढी सोपी राहिलेली नाही. पुणे हा काँग्रेसचा परंपरागत बालेकिल्ला राहिला आहे आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिकेत राष्ट्रवादीची सलग दोन वेळा सत्ता आली आहे. मात्र, या वास्तवाकडे युतीने सोयीस्कर डोळेझाक केली आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत महायुतीपुढे वर्चस्व टिकविण्याचे तर आघाडीपुढे अस्तित्व सिद्ध करण्याचे आव्हान आहे.
विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना झाल्यानंतर गेल्या निवडणुकीत पुणे लोकसभेतील सहापैकी दोन जागा भाजपला, दोन काँग्रेसला आणि प्रत्येकी एक जागा शिवसेना व राष्ट्रवादीला मिळाली. नुकत्याच झालेल्या लोकसभेत मात्र या सहाही जागांवर घसघशीत तीन लाख पंधरा हजार मतांची आघाडी मिळवीत भाजपचे अनिल शिरोळे खासदार झाले. अशीच आघाडी पुन्हा मिळणार आणि विधानसभेतही यश मिळणार असा युतीचा होरा आहे. अर्थात, वास्तवातील परिस्थिती तशी नाही. शिवाजीनगर, कॅन्टोन्मेंट आणि वडगावशेरी हे तीन मतदारसंघ काँग्रेस आघाडीला साथ देणारे आहेत. तेथील चित्र लोकसभेप्रमाणेच राहील असे मानण्याचे कारण नाही. या तीनही ठिकाणी युतीकडे अद्याप तरी तगडे उमेदवार नाहीत हेही वास्तव आहे. कसब्यातही भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष मोठा आहे. त्यामुळे आहेत त्या जागा राखून नव्या जागा जिंकण्याचे आव्हान महायुतीपुढे आहे.
कसबा
भाजपचा हा परंपरागत बालेकिल्ला. विद्यमान आमदार गिरीश बापट हे पाचव्यांदा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. पुनर्रचनेनंतर कसब्याचे भौगोलिक चित्र बदलले. त्याचे प्रत्यंतर गेल्या विधानसभा निवडणुकीत आले. बापट यांच्यापुढे आता पक्षातून मोठे आव्हान उभे राहिले आहे. त्यामुळे भाजप उमेदवारीनंतरच कसब्याची समीकरणे ठरतील. गेल्या वेळी मनसेचे रवींद्र धंगेकर व काँग्रेसचे रोहित टिळक यांनी येथे चांगली लढत दिली होती.
कोथरूड
कोथरूडमध्ये शिवसेनेचे आमदार चंद्रकांत मोकाटे यांना गेल्या वेळी मनसेचे किशोर शिंदे यांनी जोरदार लढत दिली होती. मात्र, लोकसभेत ९१ हजार मतांची विक्रमी आघाडी कोथरूडमध्ये मिळाल्यामुळे शिवसैनिकांमध्ये पुन्हा उत्साह संचारला आहे. या वेळीही येथे मुख्य आव्हान मनसेचेच राहणार असले, तरी येथील युतीवर मतदारांनी कायम निष्ठा दाखवली आहे. त्याच मतांच्या आधारे येथून सेना लढणार आहे. ही जागा आघाडीत राष्ट्रवादीकडे असली, तरी अद्याप उमेदवारीबाबत अनिश्चितताच आहे.
शिवाजीनगर
काँग्रेसचे विद्यमान आमदार विनायक निम्हण या मतदारसंघातून लढणार असले, तरी ते काँग्रेसकडून लढणार का अन्य पक्षातून, हे अद्याप उघड झालेले नाही. निम्हण यांच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चा होती. मात्र, भाजपमधून तीव्र विरोध झाल्यानंतर ही चर्चा आता थांबली आहे आणि निम्हण प्रवेश करणार नाहीत, अशी खात्री भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे. त्यामुळे भाजप येथून कोणाला उमेदवारी देणार, हाही प्रश्न उभा राहिला आहे. तूर्त तरी निम्हण यांच्या उमेदवारीवरच इतरांची गणिते अवलंबून आहेत.
पर्वती
भाजपच्या माधुरी मिसाळ यांनी येथून दणदणीत विजय मिळवला होता. आघाडीच्या जागावाटपात हा मतदारसंघ गेल्या वेळी राष्ट्रवादीला देण्यात आला होता. मात्र, या वेळी काँग्रेसने या मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांमध्ये धुसफूस आहे. या मतदारसंघाच्या मोबदल्यात कसबा राष्ट्रवादीला दिला जाईल, अशी शक्यता आहे. काँग्रेसचे अभय छाजेड, आबा बागूल, कमल व्यवहारे हे येथून इच्छुक आहेत, तर राष्ट्रवादीचे सुभाष जगताप इच्छुक असल्यामुळे येथील लढत मातबरांमध्ये होणार आहे.
कॅन्टोन्मेंट
कॅन्टोन्मेंटवर काँग्रेसचा शिक्का आहे. रमेश बागवे या राखीव मतदारसंघातून येथून विधानसभेवर निवडून गेले. या वेळीही तेच निवडणूक मैदानात उतरत आहेत. युतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे आहे आणि ती शिवसेनेकडून आरपीआयला दिली जाऊ शकते. आरपीआयचे परशुराम वाडेकर यांचे नाव कॅन्टोन्मेंटसाठी चर्चेत आहे. बागवे यांच्यापुढे या वेळी आरपीआयचे आव्हान उभे राहू शकते. या मतदारसंघात काँग्रेसला साथ देणारा मतदारवर्ग मोठय़ा संख्येने असल्याने ते महायुतीपुढील मोठे आव्हान असेल.
वडगावशेरी
पुण्यातल्या या एकमेव मतदारसंघात राष्ट्रवादीला गेल्या विधानसभेत यश मिळाले होते. बापू पठारे हेच येथून पुन्हा निवडणूक लढवणार असून, नात्यागोत्याचे राजकारण आणि या मतदारसंघातील २२ पैकी राष्ट्रवादीचे १३ आणि काँग्रेसचे तीन असे १६ नगरसेवक हे पठारे यांचे शक्तिस्थान आहे. युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे असला, तरी उमेदवाराबाबतचे चित्र अस्पष्टच  आहे. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुनील टिंगरे या मतदारसंघातून इच्छुक असून, ते मनसे वा सेनेकडून लढण्याची शक्यता आहे.