महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पक्षाला विधानसभेच्या केवळ सहा-सात जागा सोडण्याची तयारी शिवसेना-भाजपने दर्शविली असल्याचे समजते. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड नाराजी आहे. महायुतीकडून रिपब्लिकन पक्षाचा योग्य सन्मान झाला नाही, तर कार्यकर्ते बंडखोरी करतील, अशी भीती नेत्यांना वाटत आहे.  
विधानसभा निवडणुकीतील जागावाटपाबाबत शिवसेना व भाजपचे काही नेते घटक पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करीत आहेत. गेल्या आठवडय़ात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत व विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी रिपइंच्या नेत्यांशी स्वतंत्रपणे चर्चा करून त्यांना नेमक्या किती व कोणत्या जागा हव्या आहेत, याची माहिती घेतली.
रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजप-शिवसेनाला ५९ जागांची यादी दिली आहे. परंतु लगेचच त्यांनी २० जागा मिळाव्यात अशी मागणी केली. त्यानंतर आता भाजप व सेनेकडून सहा ते सात जागा सोडण्याची तयारी झाली असल्याचे समजते. शिवसेनेने मुंबईतील चांदिवली व वर्सोवा हे सध्या काँग्रेसच्या ताब्यात असलेले मतदारसंघ सोडण्याची तयारी दर्शविली आहे. राष्ट्रवादीकडील मुंब्रा मतदारसंघही रिपइंच्या गळ्यात मारण्याचे घाटत आहे. भाजपने मुंबईतील एखादी जागा सोडण्याची तयारी केली आहे.