कॉंग्रेस-राष्ट्रवादी म्हणजे मरून पडलेला साप आहे. त्या सापापासून धोका नाही त्यामुळे आमच्या एकेकाळच्या मित्रांचे ‘ढोंग’ जनतेसमोर आणणे हे महाराष्ट्र हितासाठी आम्ही कर्तव्यपालन मानतो, यामुळे भाजपच आपला मुख्य शत्रू असल्याची अप्रत्यक्ष टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ दैनिकाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
याआधीही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभांमधून मुख्यत्वे भाजपवर ताशेरे ओढले आहेत. भाजपला महाराष्ट्राच्या अस्मितेपेक्षा सत्ता प्यारी असल्याचे म्हणत मंगळवारी ‘सामना’मध्ये भाजपवर जोरादार टीकास्त्र सोडण्यात आले आहे. विनोद तावडे यांनी शिवसेनाप्रमुखांचे सुंदर स्मारक उभारण्याचे काम भाजप करील असे सांगितले. हा तर मोठा विनोदच म्हणावा लागेल. एका बाजूला महाराष्ट्राच्या अस्मितेवर गुळण्या टाकायच्या, मुंबईचे महत्त्व कमी करायचे, विदर्भ तोडायचाच हा निर्धार करायचा व दुसर्‍या बाजूला बाळासाहेबांचे सुंदर स्मारक उभारण्याची पुडी सोडायची. अखंड महाराष्ट्र व महाराष्ट्राची अस्मिता हेच बाळासाहेबांचे सुंदर स्मारक आहे. त्यावर हातोडा मारायचा व नव्या स्मारकाची वल्गना करायची. हे लग्न-बारशात पितृपक्षाचे जेवण भुरकण्यासारखेच आहे. अशा शेलक्या शब्दांत शिवसेनेने अग्रलेखातून भाजपवर हल्लाबोल केला आहे.
महाराष्ट्रात संपूर्ण गुजरात उतरवून आमच्या गुजराती बांधवांना ‘फूस’ लावण्याचे प्रयोग सुरू आहेत, पण येथील गुजराती बांधवांची निष्ठा महाराष्ट्र व बाळासाहेब ठाकरे यांच्यावरच आहे आणि तो त्याच श्रद्धेने शिवसेनेच्या पाठीशी उभा राहणार असल्याचाही उल्लेख अग्रलेखात करण्यात आला आहे.