राष्ट्रवादीने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केल्याची प्रतिक्रिया अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लॉबीत बघायला मिळाली. रा. स्व. संघाचा गणवेश असलेल्या खाकी चड्डय़ा शिवून तयार ठेवा, असा खोचक सल्ला राष्ट्रवादीच्या आमदारांना काँग्रेस आणि शिवसेनेच्या सदस्यांकडून दिला जात होता. सेनेच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार चालणार अशी चिन्हे आहेत. आता भाजपशी जवळीक वाढल्याने रा. स्व. संघाच्या कलाने तुम्हालाही घ्यावे लागणार. तेव्हा खाकी चड्डय़ा शिवून तयार ठेवा, असे सांगत राष्ट्रवादीच्या आमदारांच्या टोप्या उडविल्या जात होत्या. पक्ष नेतृत्वाचा निर्णय पक्षाच्या आमदारांना तेवढा रुचलेला दिसत नव्हता. भाजपचे गिरीष बापट आणि गिरीष महाजन हे दोन आमदार सत्ताधारी बाकावरील बाजू सांभाळत होते. त्यावर शशिकांत शिंदे आणि जितेंद्र आव्हाड यांनी ‘बिचारे गिरीष’ अशी कोटी करीत ज्येष्ठ असूनही तुमचा मंत्रिमंडळात समावेश कसा झाला नाही, असा बोचरा प्रश्न केला.