सत्तेत सहभागी व्हायचे की सन्मानाने विरोधी पक्ष म्हणून स्थान भूषवायचे, याचा निर्णय घेण्यासाठी बुधवारी सायंकाळी सहा वाजता शिवसेनेच्या सर्व नेत्यांची मातोश्रीवर बैठक बोलाविण्यात आली आहे. मात्र तत्पूर्वी भाजपच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांचा शपथविधी ३१ ऑक्टोबरला पार पडेपर्यंत वाट पाहण्याची भूमिका शिवसेनेने घेतली होती त्यानंतरच भाजपबरोबर सत्तेत सहभागी व्हायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांबरोबर शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांचा शपथविधी होणार नाही. शिवसेनेने भाजपकडे कोणत्याही ठोस मंत्रीपदांची किंवा खात्यांची मागणी केलेली नाही, असे शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. भाजपकडून कोणती भूमिका घेतली जाते, याचा अंदाज शिवसेना घेणार आहे. शिवसेनेने अनेक अटी घातल्या आहेत, मंत्रीपदे मागितली आहेत, अशा अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. पण त्यात तथ्य नसल्याचे राऊत यांनी सांगितले.
विधानसभेचे अधिवेशन ४ ते ६ नोव्हेंबर दरम्यान
नवीन सदस्यांचा शपथविधी, बहुमत सिद्ध करणे, तसेच अध्यक्षांची निवड यासाठी विधानसभेचे पहिले अधिवेशन ४ ते ६ नोव्हेंबर या काळात आयोजित करण्यात येणार आहे. नवीन सदस्यांना हंगामी अध्यक्ष गणपतराव देशमुख यांच्याकडून शपथ दिली जाईल. त्यानंतर अध्यक्षांची निवड, तसेच सरकार बहुमत सिद्ध करेल. शेवटच्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होईल.