बाबरी मशिद पडल्यानंतर मुंबईत उडालेल्या हाहाकारात शिवसेनाच व्यापाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती, हे विसरू नका, असे प्रतिपादन शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सेंट्रल मैदान येथे शनिवारी संध्याकाळी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत केले. सध्या महाराष्ट्रात निवडणुका जिंकण्यासाठी जोरदार लक्ष्मीदर्शन सुरू आहे. केंद्रीय मंत्र्यांची अफजलखानरूपी फौज महाराष्ट्रावर चाल करून आली आहे.  जनता राजकीय कोथळा काढून या महत्त्वाकांक्षी प्रवृत्तींना धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दिल्लीत बसून महाराष्ट्राच्या सत्तेची स्वप्ने पाहणाऱ्या भाजपला लोकसभेनंतर इतर राज्यात झालेल्या पोट निवडणुकांमध्ये सपशेल पराभव पत्करावा लागला, याची आठवण करून देत उद्धव ठाकरे यांनी कल्याणच्या सभेत मोदींचे नाव न घेता दिल्लीची बिल्ली अशी खिल्ली उडवली. यापुढे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्ली ठरविणार नाही, असेही ते म्हणाले.
‘शिवसेनेला राज्यात एकहाती सत्ता द्या’
कल्याण: या वेळची विधानसभा निवडणूक महाराष्ट्राचे भवितव्य घडविणारी आहे. राज्यात भगव्याची लाट आली आहे. फक्त एकहाती सत्ता द्या. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवून दाखवीन, असे प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी येथे सेना उमेदवारांच्या प्रचार सभेत केले.राज्यात अठरा सेनेचे खासदार निवडून येतील, असा एकही सव्‍‌र्हे बोलला नव्हता. आता जे निवडणूक अंदाज वर्तवले जातायेत. ते पेड असल्याचा संशय वाटतो. संपूर्ण राज्य भगवेमय झाले असताना असे चुकीचे चित्र हेतुपुरस्सर उभे केले जात आहे. भाजपबरोबरची युती तुटली असली तरी एक जण सोबत नाही म्हणून काही बिघडत नाही. अख्खा महाराष्ट्र सेनेच्या पाठीमागे आहे. एकहाती सत्ता घेण्यासाठी ही चांगली संधी आहे, असे ठाकरे म्हणाले.