रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) प्रमुख रामदास आठवले यांनी विधानसभेत भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोमवारी शिवसेना पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वृत्तपत्रातून त्यांच्यावर कडाडून टीका करण्यात आली. रामदास आठवले यांनी केंद्रीय मंत्रिपदाच्या मोहापायी राज्यातील आंबेडकरी जनतेला दगा दिल्याचे ‘सामना’तील अग्रलेखात म्हणण्यात आले. आठवलेंसारख्या गोंधळी नेतृत्वामुळेच आंबेडकरी विचारांची वाट लागल्याचे टीकास्त्र शिवसेनेकडून सोडण्यात आले आहे. मात्र, आंबेडकरी जनता महाराष्ट्रहितासाठी शिवशक्तीबरोबरच राहणार असल्याचा विश्वासही अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला. शिवसेनेने आठवले यांच्यावर कडाडून टीका करताना, आज जे लोक आठवल्यांच्या पायाशी कमळपाकळ्यांचे सडे पाडत आहेत तेच लोक आठवल्यांना पाहून दरवाजे धाडकन बंद करून घेत होते, पण काळाचा महिमा अगाध असल्याचे म्हटले. नवा सौदा असा झालेला दिसतो की, आठवले यांना केंद्रात मंत्रीपदाचा चोथा दिला जाईल व भाजपची सत्ता आलीच तर सत्तेत १० टक्के वाटा दिला जाईल! बाकी विधानसभेच्या ७-८ जागा चणे-फुटाणे म्हणून त्यांच्या हाती ठेवल्या असल्या तरी केंद्रातील मंत्रीपदाचा गूळ हेच सौदा यशस्वी होण्याचे मुख्य कारण आहे. यापूर्वी शनिवारी मुंबई येथे झालेल्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी आठवलेंसमोर शिवसेनेसोबत आल्यास उपमुख्यमंत्रिपद देण्याचा प्रस्ताव ठेवला होता.