News Flash

महापौरपद : शिवसेनेतर्फे स्नेहल आंबेकर यांना उमेदवारी

महापौरपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात असलेल्या नगरसेविका यामिनी जाधव तसेच डॉ. भारती बावदाणे यांचा पत्ता कट करत अखेरच्या क्षणी परळ बीडीडी चाळ विभागातील नगरसेविका स्नेहल

| September 6, 2014 03:53 am

महापौरपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जात असलेल्या नगरसेविका यामिनी जाधव तसेच डॉ. भारती बावदाणे यांचा पत्ता कट करत अखेरच्या क्षणी परळ बीडीडी चाळ विभागातील नगरसेविका स्नेहल आंबेकर यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरला. पालिकेतील बहुमत सेनेकडे असल्याने आंबेकर यांचे महापौरपद निश्चित मानले जात आहे. भाजपाकडून उपमहापौरपदासाठी सांताक्रूझ येथील अलका केरकर यांना उमेदवारी मिळाली आहे.
महापौरपद हे अनुसूचित जातीमधील महिलेसाठी राखीव असल्याने सेनेच्या डॉ. भारती बावदाणे, स्नेहल आंबेकर तसेच यामिनी जाधव या तिघींची नावे चर्चेत होती. यामिनी जाधव यांचा पालिका कामकाजातील अनुभव पाहता त्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. विक्रोळीच्या नगरसेविका डॉ. भारती बावदाणे यांचे शिक्षण जमेची बाजू होती. त्यातच महापौरपद हे मुंबईच्या दक्षिण, पश्चिम तसेच पूर्व उपनगरात आलटून पालटून देण्याचा प्रघात आहे. विद्यमान महापौर सुनील प्रभू पश्चिम उपनगरातील तर त्यांच्याआधी श्रद्धा जाधव शहरातील असल्याने विक्रोळी येथून निवडून आलेल्या डॉ. भारती बावदाणे यांना उमेदवारीची अधिक संधी होती. या तुलनेत आंबेकर यांच्या नावाची फारशी चर्चा नव्हती. मात्र दुपारी पावणेचार वाजता मातोश्रीवरून स्नेहल आंबेकर यांच्या नावाचा निरोप वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आला आणि अवघ्या दहा मिनिटांत उमेदवारी अर्ज भरला गेला.
सुनील प्रभू यांचा कार्यकाल ९ सप्टेंबर रोजी पूर्ण होत असून त्याच दिवशी महापौरपदासाठी निवडणूक होईल. या पदासाठी काँग्रेसकडून चेंबूर येथील डॉ. प्रियतमा सावंत यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. उपमहापौरपदासाठी भाजपाकडून अलका केरकर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून पवई येथील चंदन शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पालिकेच्या सभागृहात शिवसेना (७५), अभासे (२), भारीप (१), रिपाई (१), अपक्ष (९) आणि भाजपा (३२) असे १२० नगरसेवकांचे संख्याबळ आहे. काँग्रेस (५२), मनसे (२७), राष्ट्रवादी (१३), सपा (९), शेकापम (१) व अपक्ष (४) विरोधी गटात आहेत.  
महिलांसाठी तसेच मुलांसाठी विशेष काम करण्याची, महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि सार्वजनिक शौचालयांसाठी काम करण्याची इच्छा असल्याचे स्नेहल आंबेकर यांनी सांगितले.
परळमधून तिसरा महापौर
परळ -बीडीडी चाळ मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवणाऱ्या स्नेहल आंबेकर यांचे महापौरपद आता जवळजवळ निश्चित झाले आहे. या मतदारसंघातून महापौर पदापर्यंत पोहोचणाऱ्या त्या तिसऱ्या नगरसेवक ठरल्या आहेत. याच मतदारसंघातून निवडून आलेले महादेव देवळे आणि त्यापूर्वी दत्ताजी नलावडे यांना मुंबईच्या महापौरपदाचा मान मिळाला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2014 3:53 am

Web Title: shiv sena snehal ambekar set to be next mayor
टॅग : Snehal Ambekar
Next Stories
1 ठाणे महापौरपदासाठी संजय मोरे यांची निवड
2 ‘राष्ट्रवादीचे नेते माझ्या जीवावर उठले होते’
3 विदर्भासाठी सरकारी नोकऱ्यांमध्ये काँग्रेस नेत्यांना स्वतंत्र आरक्षण हवे
Just Now!
X