शिवसेनेबरोबर निर्माण झालेली कटुता संपुष्टात आणण्यासाठी अध्यक्ष अमित शहा यांनी पुढाकार घेतल्यानंतर आणि शिवसेनेला बरोबर घेऊनच सरकार स्थापन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर शिवसेनेची ताठर भूमिका आता मवाळ झाली आहे. शिवसेनेलाही काहीही करुन सत्ता हवी असल्याने ‘अफझलखानाच्या फौजा, दिल्लीश्वरांपुढे झुकणार नाही’ अशा केलेल्या वल्गना विसरुन सरकारमध्ये सामील होण्याची तयारी शिवसेनेने सुरु केली आहे. शिवसेना-भाजपच राज्याला स्थिर सरकार देईल, असा विश्वास शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी व्यक्त केला.
शपथविधी समारंभावर बहिष्कार टाकण्याच्या पवित्र्यामुळे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी अध्यक्ष अमित शहा, अरुण जेटली आणि देवेंद्र फडणवीस यांनी दूरध्वनी करुन चर्चा केली. शिवसेनेला योग्य सन्मान दिला जाईल, या आश्वासनामुळे ठाकरे व शिवसेनेचे नेते शपथविधीसाठी उपस्थित राहिले. शपथविधी समारंभानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी व शहा यांच्याशी ठाकरे यांची भेट झाली. शिवसेनेबरोबरच स्थिर सरकार स्थापन करायचे आहे, असे आश्वासन देण्यात आले आहे. शिवसेनेला किती मंत्री पदे व कोणती खाती दिली जातील, हे स्पष्ट झालेले नाही. उपमुख्यमंत्रीपद आणि किमान १२ मंत्रीपदांची सेनेला अपेक्षा आहे. त्यासाठी संबंधितांची पुढील आठवडय़ात बैठक होणार असून विश्वासदर्शक ठरावापूर्वी शिवसेनेशी बोलणी पूर्ण केली जाणार आहेत.
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पुढाकार घेतल्याने शिवसेना सरकारमध्ये सहभागी होण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. शिवसेनेच्याही अनेक नेत्यांना आता सत्तेबाहेर राहण्यापेक्षा मिळतील तेवढी मंत्रीपदे व खाती घेऊन तडजोड व्हावी, अशी इच्छा आहे. त्यामुळे आता भाजपने विचारणा केल्यावर आपण आडमुठी भूमिका घेऊ नये, असे शिवसेना नेत्यांना वाटत आहे. यासंदर्भात शिवसेनेची भूमिका काय आहे असे विचारता प्रवक्ते खासदार संजय राऊत म्हणाले, आता गुंता सुटू लागला आहे. शिवसेना-भाजपच राज्याला स्थिर सरकार देऊ शकेल.’

शिवसेनेबरोबर सकारात्मक चर्चा सुरू – मुख्यमंत्री
सरकारला पाठिंबा देण्यावरून शिवसेनेबरोबर वाटाघाटी सुरू असून ही सारी चर्चा सकारात्मक असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी दिली. शिवसेनेने शपथविधी समारंभावर बहिष्कार घातला हे वृत्त गुरुवारी मी दिल्लीत असताना समजले तेव्हा आश्चर्य वाटले होते. पक्षाध्यक्ष अमित शहा आणि मी स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी शपथविधी समारंभाला येण्याचे मान्य केले. ठाकरे शपथविधी समारंभाला उपस्थित राहिल्याबद्दल फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. शिवसेनेबरोबर सध्या चर्चा सुरू आहे. यातून निश्चितच मार्ग निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.