निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यास कोणाच्याही पाठिंब्याची गरज भासणार नाही. मात्र, तसे झाले नाही तर राज्याच्या हितासाठी भाजप आणि शिवसेनेला एकत्र यावेच लागेल, असे मत रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. शिवसेनेला सोबत घेऊन जाण्याची गरज पडली, तर आपण स्वतः उद्धव ठाकरे यांची भेट घेऊ, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी राज्यात मतदान झाले. मतदारांनी कोणाच्या पारड्यात आपला कौल दिला आहे, हे आता येत्या रविवारी मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. दरम्यान, विविध एक्झिट पोलनी भाजप राज्यात सर्वांत मोठा पक्ष ठरण्याची शक्यता वर्तविली आहे. काहींनी भाजपच्या नेतृत्त्वाखाली युतीला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे तर काहींनी भाजपला सत्ता प्राप्त करण्यासाठी इतर पक्षांची मदत घ्यावीच लागेल, असे म्हटले आहे. यदाकदाचित भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्यास इतर पक्षांची मदत घ्यावी लागली, तर ते कोणाला प्राधान्य देतील, यावरूनही विविध तर्कवितर्क लढविले जात आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आठवले यांनी शिवसेना हा भाजपचा नैसर्गिक मित्र आहे. त्यामुळे त्या दोघांनी एकत्र आले पाहिजे. त्यासाठी आपण प्रयत्न करू, असे स्पष्ट केले. त्याचवेळी भाजप सत्तास्थापनेसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मदत घेईल, हा अंदाज त्यांनी थेटपणे फेटाळला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मदत घेण्याची अजिबात शक्यता नसल्याचे त्यांनी सांगितले.