भाजप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस या तिन्ही पक्षांनी आपल्या जाहिरातींमध्ये निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांच्या छायाचित्रांचा वापर केल्यामुळे तो खर्च संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात दाखविण्याची मागणी शिवसेनेने निवडणूक आयोगाकडे केली आहे. ही मागणी करीत शिवसेनेने भाजपच्या देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार, एकनाथ खडसे यांच्यासह कॉंग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी पत्रकार परिषद घेऊन मंगळवारी ही मागणी केली. प्रचारात मर्यादेपेक्षा जास्त खर्च केल्याचे आढळल्यास या सर्वांना तातडीने निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरविण्याची मागणीही शिवसेनेने केली आहे.
पक्षाची जाहिरात करताना त्यामध्ये कोणत्याही उमेदवाराचे छायाचित्र प्रसिद्ध केल्यास संबंधित जाहिरातीचा खर्च उमेदवाराच्या खर्चामध्ये लावण्याचा निवडणूक आयोगाचा नियम असल्याचे सांगून रावते म्हणाले, वृत्तपत्रांमध्ये या तिन्ही पक्षांच्या ज्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यामध्ये सध्या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांचे छायाचित्र वापरले आहे. हा एक प्रकारे उमेदवाराचा प्रचारच असल्याने संबंधित जाहिरातीचा खर्च त्या त्या उमेदवाराच्या निवडणूक खर्चात धरण्यात यावा. जर हा खर्च प्रचारासाठी घालून दिलेल्या खर्चाच्या मर्यादेपेक्षा जास्त असेल, तर या सर्वांना तातडीने निवडणूक लढविण्यासाठी अपात्र ठरविण्यात यावे, अशीही मागणी शिवसेनेने केली असल्याचे रावते यांनी सांगितले. निवडणुकीच्या प्रचारासाठी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांच्या अभ्यास करूनच शिवसेनेने तक्रार केल्याचे रावते यांनी स्पष्ट केले. वृत्तपत्रांसोबतच वाहिन्यांवरसुद्धा या तिन्ही पक्षांच्या जाहिरातींमध्ये निवडणूक लढवित असलेल्या नेत्यांचा वापर करण्यात आलेला आहे. त्यामुळे तो खर्चही संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात धरावा, अशीही मागणी पक्षाने केलेली असल्याचे रावते यांनी स्पष्ट केले.